बंगळुरू, भारत- नोव्हेंबर १४, २०२४- इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन (ISF) ने आज सहा प्रवर्गात २०२४ सालासाठी इन्फोसिस पुरस्कारांची घोषणा केली. अर्थशास्त्र, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान, मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान, जीवशास्त्र, गणित, आणि भौतिकशास्त्र या शाखांचा त्यात समावेश आहे. या संस्थेची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. ज्यांच्या संशोधन आणि शिष्यवृत्तीमुळे भारताला फायदा झाला आहे, अशा वैज्ञानिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. सुवर्णपदक, मानचिन्ह आणि १००,००० अमेरिकन डॉलर ( किंवा हीच रक्कम रुपयात)असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा सोहळा आयएसएफच्या बंगळुरू कार्यालयात पार पडला.
इन्फोसिस पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांची आंतरराष्ट्रीय समितीतर्फे निवड झाली. त्यात जगभरातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश होता. गेल्या १५ वर्षात, इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर प्रभाव टाकणाऱ्या संशोधन आणि विद्वत्तेची ओळख करून दिली आहे. २०२४ मध्ये, या पुरस्काराने एक नवी दिशा स्वीकारली असून, ४० वर्षांखालील संशोधकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. असाधारण प्रतिभेला अल्पकाळात ओळख निर्माण करून देण्याची गरज अधोरेखित करणे हा यामागचा उद्देश आहे.
या पुरस्काराची घोषणा आयएसएफच्या विश्वस्तांतर्फे करण्यात आली. या मंडळात क्रिस गोपालकृष्णन (विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष), नारायण मूर्ती, के. दिनेश, डॉ.प्रतिमा मूर्ती, मोहनदास पै, एस.डी शिबुलाल, आणि त्याचबरोबर विश्वस्त मंडळातील इतर सदस्य नंदन निलेकणी, श्रीनाथ बटनी, आणि सलील पारेख यांनीही विजेत्यांचं अभिनंदन केलं.
इन्फोसिस पुरस्कार भारतातील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिभा ओळखणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. इन्फोसिस पुरस्काराचे मानकरी अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यात नोबेल पुरस्कार (अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो), फिल्ड्स मेडल (मंजुल भार्गव आणि अक्षय वेंकटेश), डॅन डेव्हिड पुरस्कार (संजय सुब्रह्मण्यम), मॅकआर्थर ‘जिनियस’ ग्रँट (सुनील अमृत), फंडामेंटल फिजिक्समधील ब्रेकथ्रू पुरस्कार (अशोक सेन), आणि मार्कोनी पुरस्कार (हरी बालकृष्णन) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही मानकऱ्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात गगनदीप कांग यांचा समावेश आहे, त्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडल्या गेलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन म्हणाले, “इन्फोसिस पुरस्काराने अशा बुद्धिमान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यांच्या योगदानामुळे संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील भविष्याला दिशा मिळत आहे. यावर्षी, आम्ही ४० वर्षांखालील संशोधकांना त्यांच्या कार्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सन्मानित करण्यासाठी आमचे लक्ष केंद्रित केले आहे, त्यांच्या अमर्याद क्षमतेची आणि बदल घडविणाऱ्या कार्याची दखल घेतली आहे. इन्फोसिस सायन्स फाउंडेशनतर्फे, मी इन्फोसिस पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या कामगिरीमुळे विज्ञान आणि समाज यांच्यातील महत्त्वाचं नातं अधोरेखित होतं आणि पुढील पिढीतील संशोधकांना आणखी प्रेरणा मिळते.”
इन्फोसिस पुरस्कार २०२४ चे सहा प्रवर्गातील मानकरी खालीलप्रमाणे आहेत:
अर्थशास्त्र
अरुण चंद्रशेखर
इन्फोसिस पुरस्कार २०२४ मधील अर्थशास्त्र विभागातील पुरस्कार स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक अरुण चंद्रशेखर यांना देण्यात आला आहे. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक नेटवर्कच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. नावीन्यपूर्ण माहिती आणि मशीन लर्निंग तसंच संगणक विज्ञानातील सैद्धांतिक पद्धतींचा वापर करून हे संशोधन केलं आहे. कर्नाटकातील अनेक गावांतील नेटवर्क डेटा संकलित करून त्याचे मॅपिंग केल्यामुळे विकास अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक उत्कृष्ट आधार मिळाला आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेत नेटवर्कची भूमिका त्यांच्या कार्यामुळे स्पष्ट होते. त्यांच्या कार्यामुळे अधिक चांगल्या धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.
अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान
श्याम गोलाकोटा
अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस पुरस्कार २०२४ साठी स्कूल ऑफ कॉप्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्राध्यापक श्याम गोलाकोटा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाने आणि तंत्रज्ञान रूपांतरणाने अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी योगदान दिलं आहे. त्यामध्ये निम्न आणि मध्यम उत्पन्नवर्गातील असलेल्या देशांसाठी स्मार्टफोन-आधारित परवडणारी आरोग्य साधनं, बॅटरीशिवाय कॉम्प्युटेशन आणि संवाद, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मानवाच्या श्रवण क्षमतेचे संवर्धन या क्षेत्रांचा समावेश आहे.
मानव्य विद्या आणि समाजशास्त्र क्षेत्र
महमूद कुरिया
मानव्यविद्या आणि समाजशास्त्र या क्षेत्रातील इन्फोसिस पुरस्कार २०२४ महमुद कुरिया यांना देण्यात आला आहे. ते स्कूल ऑफ हिस्ट्री, क्लासिक्स अँड आर्कियोलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथे प्राध्यापक आहेत. जागतिक दृष्टिकोणातुन सागरी इस्लामच्या अभ्यासातील महत्त्वपूर्ण आणि मौलिक योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या संशोधनात विशेषतः प्राचीन आणि प्रारंभिक आधुनिक काळातील केरळवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या या संशोधनाने हिंदी महासागरावरील किनारपट्टीवर आर्थिक, राजकीय, आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्यात इस्लामी कायद्याची महत्त्वाची भूमिका या संशोधनामुळे समोर आली आहे.
जीवशास्त्र
सिद्धेश कामत
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (IISER) सहयोगी प्राध्यापक सिद्धेश कामत यांना जीवशास्त्र क्षेत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बायोऍक्टिव्ह लिपिड्स, त्यांचे रिसेप्टर्स आणि त्यांचं मेटाबॉलिझम आणि सिग्नलिंग मार्ग यांच्याशी संबंधित त्यांच्या शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. लिपिड्स हा पेशींचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याचं कार्य समजून घेण्यासाठी त्यांनी वापरलेल्या प्रगत पद्धतींमुळे या रेणूंची विविध पेशी कार्य आणि मानवी रोगांमध्ये असलेली भूमिका समजून घेण्यात या संशोधनामुळे मदत झाली आहे.
गणित
नीना गुप्ता
कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेतील थिअरॉटिकल स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स विभागाच्या प्राध्यापक नीना गुप्ता यांना २०२४ चा इन्फोसिस पुरस्कार देण्यात आला आहे. आधुनिक बीजगणितीय भूमितीच्या संस्थापकांपैकी एक असलेले ऑस्कर झारिस्की यांनी १९४९ मध्ये मांडलेल्या झारिस्की कॅन्सलेशन समस्येवर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. बीजगणितीय भूमितीतील या मूलभूत समस्येवर २०१४ मध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष सिद्ध केला, ज्यात असनुमा यांच्या ३-आयामी एफाइन वेरायटीमुळे सकारात्मक वैशिष्ट्यात झारिस्की यांच्या मूळ कॅन्सलेशन समस्येचे नकारार्थी उत्तर मिळते.
भौतिक विज्ञान
वेदिका खेमानी
भौतिक विज्ञान क्षेत्रात इन्फोसिस पुरस्कार २०२४ हा स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिका वेदिका खेमानी यांना देणयात आला आहे. त्यांनी सैद्धांतिक आणि प्रायोगिक नॉन-इक्विलिब्रियम क्वांटम पदार्थांच्या क्षेत्रात व्यापक आणि क्रांतिकारक योगदान दिलं आहे, विशेषतः टाइम-क्रिस्टल्स या संकल्पनेचा शोध लावण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या संशोधनामुळे भविष्यकाळातील क्वांटम कम्प्युटिंग आणि इतर तंत्रज्ञानांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण परिणाम घडू शकतात.


