पिंपरी, दि. २९ नोव्हेंबर २०२४ :- सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील दुस-या टप्याची वाटचाल त्यामुळे सेवानिवृत्तीचा दिवस चांगल्या आठवणींना सोबत घेऊन साजरा करावा व त्या आठवणींमध्ये आपले पुढील आयुष्य अधिक सुंदर बनवावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलेल्या कामकाजामुळे महापालिका यशस्वीरित्या वाटचाल करत प्रगतीपथावर पोहोचली याबाबत त्यांचेप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या २ अश्या एकूण १९ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशिला जोशी, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, राजू लांडे, नथा मातेरे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे नोव्हेंबर २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, वासुदेव मांडरे, उपअभियंता संजय माने, वासुदेव अवसरे लेखापाल गौरी जानराव, कनिष्ट अभियंता रत्नाकर कुलकर्णी, उपशिक्षक हेमंत साठे, नंदा बच्चे, शिपाई संजय निकम, मजूर कन्हैय्यालाल डांगे, काशिनाथ परदेशी, तानाजी पाडाळे, रखवालदार अरुण बारणे, संताजी काळोखे, मुकादम कैलास खरात, पॉल अंतोनी, सफाई सेवक मुन्नी हाडाळे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्प्रे कुली विजय कांबळे, सफाई सेवक महादू कडलक यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.