Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय कर्तव्य अभियानाच्या वतीने वारकरी युवा कीर्तनकार संमेलन संपन्न* कीर्तनकार संत...

राष्ट्रीय कर्तव्य अभियानाच्या वतीने वारकरी युवा कीर्तनकार संमेलन संपन्न* कीर्तनकार संत मठाधिपती यांच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर गो ग्राम’ अभियानासाठी एक गाव निवड प्रक्रिया सुरू ; राज्यभरातील २५० पेक्षा अधिक कीर्तनकार, संत आणि मठाधिपती यांचा सहभाग

पुणे : राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्रच्या वतीने आळंदी देवाची येथे वारकरी युवा किर्तनकार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या विशेष संमेलनात राज्यभरातील २५० पेक्षा अधिक कीर्तनकार, संत आणि मठाधिपती उपस्थित होते. आत्मनिर्भर गो ग्राम अभियान राबवून देशी गोवंश संवर्धन व नैसर्गिक शेतीला गती देण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला.

संमेलनात विदर्भ रत्न ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, महाराष्ट्र गो सेवा आयोग सदस्य संजय भोसले, राष्ट्रीय कर्तव्य अभियान संयोजक विजय वरूडकर, ह.भ.प.चिदंबर महाराज, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, ह.भ.प. गोरक्षनाथ घाडगे, मनीषा घाडगे यांसह २५० पेक्षा अधिक कीर्तनकार संमेलनास उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. गोसेवा आणि ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाने वारकरी परंपरेला नवसंजीवनी दिली आहे.

सन २०२२ मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापनेसाठी कीर्तनकारांनी मोठी भूमिका बजावली होती. या प्रयत्नांचे फळ म्हणून सरकारने गो सेवा आयोग स्थापन केला, तसेच यावर्षी गोमातेला राज्यमाता म्हणून मान्यता दिली. या पुढच्या टप्प्यात गो संवर्धनाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘आत्मनिर्भर गो ग्राम अभियान’ सुरू करण्यात येत आहे.

ह.भ.प. संजय महाराज पाचपोर म्हणाले, गोपालक आणि गाय याविषयाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. अनादी काळापासून गोसेवा हीच जीवनाच्या आनंदाचा मार्ग आहे आणि हे आपल्या वेद तसेच संत वाङ्मयात सांगितले आहे. यामुळे प्रत्येक कीर्तनकाराने गो ग्राम या उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

विजय वरुडकर म्हणाले, गो संवर्धन विषयास गती व गुणवत्ता देण्यासाठी व देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती विकास करण्यासाठी राज्यातील किर्तनकार, संत, मठ मंदिरे यांनी किमान एका गावाचे पालकत्व घ्यावे व आत्मनिर्भर गो ग्राम अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी आभासी संवादाद्वारे शुभेच्छा दिल्या. तर सदस्य संजय भोसले यांनी राष्ट्राच्या विकासासाठी गोमाता विषयक ५ जी सूत्र सांगितले,

ह.भ.प. गोरक्षनाथ घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, मनीषा घाडगे यांनी आभार मानले. आत्मनिर्भर गो ग्राम अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments