पुणे : मूर्ती पूजन न करणारा कोणताही धर्म नाही. निर्गुण निराकाराची पूजा करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. सामान्य माणूस देवाच्या मूर्तीचे दर्शन घेतो, त्याच्याकडे मागणे मागतो, परंतु त्या मूर्तीचे रूप पाहत नाही. निर्गुणाकडे जायचे असेल तर सगुणाच्या मार्गातून जावे लागते, असे मत ज्येष्ठ मूर्ती शास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या १५४ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. लॉ कॉलेज रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे सचिव डॉ. दिलीप जोग, डॉ.सुषमा जोग, खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते.
निसर्ग वेध संस्थेचे संस्थापक किरण पुरंदरे यांना रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने तर ‘आपलं घर, पुणे’ या संस्थेला डेव्हिडा रॉबर्टस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये २५ हजाराचा धनादेश व मानचिन्ह असे तीनही पुरस्काराचे स्वरूप होते.
गो. बं. देगलूरकर म्हणाले, नास्तिक माणसे बुद्धिमान असतात, असे समजले जाते परंतु हा गैरसमज आहे. कारण त्यांना आस्तिक म्हणजे काय हे माहित नसते. आस्तिक होऊन नास्तिकते पर्यंत जाता येते. प्रार्थना समाज सारख्या संस्थांना सक्रिय उत्तेजन देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
किरण पुरंदरे म्हणाले, माणसाची हाव वाढली तर निसर्गावरचे घाव वाढतात. निसर्गासोबत एकरूप झालो तर निसर्गाला माणसामुळे जो त्रास होतो त्याची उत्तरे सापडतात. ग्लोबल नेचर कंजर्वेशन इंडेक्स मध्ये भारताचा १७६ वा क्रमांक आहे हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. निसर्ग विषय प्रश्न तरुणांनी हाती घेतले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रतापराव पवार म्हणाले, हिंदू धर्मात ज्या ज्या वेळी सामाजिक सुधारणांची वेळ आली त्या त्या वेळी वेगळे पंथ झाले. त्यामुळे जे समाज सुधारक आले ते धर्माच्या बाबत फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु स्त्रियांचे शिक्षण, सतीबंदी, बालविवाह प्रतिबंध अशा चांगल्या गोष्टीही समाजसुधारकांमुळे झाल्या. सामाजिक सुधारणा ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने काम करून समाज सुधारणा आणि समाज प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विजय फळणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. डाॅ. दिलीप जोग यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. सुषमा जोग यांनी आभार मानले. डाॅ.शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले. नमिता मुजुमदार यांनी उपासना चालविली.


