पुणे: फुलांनी सजलेले पेशवेकालीन श्रीराम मंदिर… पारंपरिक वस्तूंनी सजलेले रुखवत… सनई चौघड्याचे मंगलमय सूर आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा पवित्र आणि ऐतिहासिक विवाह सोहळा पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभविला. महाराष्ट्रात प्रथमच श्री सीतामाई व प्रभू श्रीरामचंद्र विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.
श्री रामजी संस्थान, तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रभू श्रीराम आणि राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या श्री सीतामाई यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते.
कुडलि शृंगेरी महासंस्थान मठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
विवाह सोहळ्यातील पारंपरिक विधींसह हळद, कन्यादान आणि मधुपर्क यांसारख्या विधींनी सोहळा साजरा करण्यात आला. मंगलाष्टकांच्या स्वरात देवतांच्या मूर्तींवर अक्षता टाकून श्रीराम आणि सीतेचा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला ११ वाजून ४८ मिनिटांनी संपन्न झाला.
भरत तुळशीबागवाले म्हणाले, श्री सीता रामचंद्र विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धर्म, नीती, आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला होता, जो भारतीय विवाहसंस्थेचा आदर्श मानला जातो. श्रीराम हे धर्माचे प्रतीक असून माता सीता या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह भक्तांसाठी आदर्श सहजीवनाचा संदेश देतो. त्यामुळे हा सोहळा पुण्यातील तुळशीबाग राममंदिरात प्रथमच साजरा करण्यात आला.