पुणे : नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक : न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत… या भगवद््गीतेतीचा सार असलेल्या या श्लोकासह संपूर्ण गीतेचे पठण दत्तजयंती उत्सवात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झाले. भगवद््गीतेची प्रार्थना, १८ अध्यायांचे पठण, गीता महात्म्य, गीतेची आरती अशा सामुदायिक पठणाने दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्षी दत्तजयंती उत्सवात व गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त श्रीमद् भगवतगीता ज्ञानयज्ञ सामुदायिक गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर श्री दत्त कलामंच येथे करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, डॉ. पराग काळकर, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, गीता धर्म मंडळाच्या अनुजा चोपडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस व त्यांच्या पत्नी प्रांजली फडणवीस यांच्या हस्ते श्री दत्त गुरु दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले.
प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, योग आणि गीता यांचे जवळचे नाते आहे. गीता पठणाने वातावरण प्रसन्न होते. दत्तजयंतीसारख्या उत्सवात गीता पठणाचा कार्यक्रम होणे, हे उत्तम आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पराग काळकर म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरा हा विषय आहे. त्यामुळे गीतेमधील शास्त्रीय विचार व दृष्टीकोन विद्यार्थ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविता येतील, हा प्रयत्न नक्की करु. यामुळे विद्यार्थी जीवन सफल होईल. तसेच प्रत्येकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी देखील सकारात्मक होईल.
या कार्यक्रमात अश्वारोहण क्रीडा प्रकारातील उदयोन्मुख क्रीडापटू ईशिता सोमण हिला ट्रस्टतर्फे १० हजार रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात आली. अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.