पुणे,18 डिसेंबर २०२४ : लोकमान्य मेडिकल रिसर्च सेन्टर पुणे, चिंचवड, येथे नुकतेच लोकमान्य इंटिग्रेटीव्ह पॅलिएटिव्ह केअर युनिटचा उदघाटन सोहळा पार पडला. सदर उदघाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे व प्रख्यात उद्योजक हरिविलास कासट व रमेश कासट, यांसह लोकमान्य मेडिकल रिसर्च सेन्टरचे विश्वस्त डॉ.विक्रम घोले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल क्षीरसागर, संचालक श्रीनिवास पत्तार, सहसंचालक डॉ. बिना राजन, सचिव मोली अँड्र्यूज, लोकमान्य नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य स्मिता उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लोकमान्य मेडिकल रिसर्च सेन्टरने गेल्या चार दशकामध्ये केलेल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करण्यात आला. विशेषतः कर्करोग चिकित्सा, सेफलाइफ इनीशिएटिव्ह, काही प्रकारच्या औद्योगिक व्यवसायांमुळे उदभवणारे आजार, संबंधित कार्य, आरोग्य शिक्षण, आयुष इंटिग्रेटीव्ह या पाच क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले. यावेळी लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल क्षीरसागर यांनी कॅन्सर सेन्टरची माहिती दिली.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते व परिहार सेवा तज्ज्ञ डॉ. प्रिन्स जॉय यांनी परिहार सेवा काळाची गरज या विषयावर आपले व्याख्यान सादर केले. डॉ.व्ही.जी.वैद्य यांनी पॅलिएटिव्ह केअर युनिट मागील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी व्याख्यानामध्ये पॅलिएटिव्ह बद्दल समज गैरसमज, गरज आणि परिहार सेवेचे कार्य यावर मार्गदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच या सेवेची उपलब्धता करून दिल्याबद्दल लोकमान्य मेडिकल रिसर्च सेन्टरचे कार्यकारी विश्वस्त डॉ. व्ही. जी. वैद्य यांनी आभार व्यक्त केले. या सेवेचा लाभ पिंपरी-चिंचवडकर व इतर जवळच्या परिसरातील लोकांनी घ्यावा असे त्यांनी नमूद केले.
उद्योजक श्याम कासट यांनी समस्थ कासट परिवारातर्फे देण्यात आलेल्या पॅलिएटिव्ह केअर उभारण्यासाठी देणगी ही योग्य ठिकाणी दिल्याचे समाधान व्यक्त केले.
स्वयंसेवक श्रीधर लोखंडे यांनी पॅलिएटिव्ह केअर मध्ये स्वयंसेवकांची गरज व आदर्श भूमिका यावर मत मांडले.
कार्यक्रमाची सांगता व आभारप्रदर्शन लोकमान्य मेडिकल रिसर्च सेन्टरचे कार्यकारी संचालक, विश्वस्त डॉ.व्ही.एस. घोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बिना राजन यांनी केले.


