पुणे,20 डिसेंबर 2024 : पुणेस्थित नादसप्तक संगीत विद्यालय तर्फे भारतीय शास्त्रीय संगीतामधील प्रसिध्द यमन (कल्याण) या अतिशय सुंदर,हृदयस्पर्शी रागावर 101 मराठी व हिंदी गाण्यांच्या ‘यमनरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम बुधवार,25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता बालशिक्षण हायस्कूल,एमईएस ऑडिटोरियम,मयूर कॉलनी,कोथरूड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सर्वांचा आवडता राग यमन (कल्याण) या रागावर आधारित मराठी,हिंदी,संस्कृत आणि सिंधी भाषेतील एकूण 101 गाणी सादर केली जाणार आहेत. या मैफिलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमी नोंद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य असून दुपारी 2.30 ते रात्री 8.30 या वेळेत जवळपास सहा तासांची मैफल रंगणार आहे. नादसप्तक संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन केले आहे.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीतकार आणि ज्येष्ठ गायक श्रीधर फडके उपस्थित राहणार असून पुण्यातील संगीत क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना नादसप्तक संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर म्हणाले की,या कार्यक्रमात सादर केली जाणारी गाणी ही मी स्वत: आणि नादसप्तक संगीत विद्यालयात शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमातील गाण्यांच्या संगीत संयोजन टीममध्ये प्रख्यात कलाकार सहभागी होणार असून यामध्ये पुण्यातील ज्येष्ठ कीबोर्ड वादक व संगीत संयोजक विवेक परांजपे,युवा तबला वादक आणि नादसप्तक चे संचालक अक्षय पंचवाडकर, नागेश भोसेकर, गायिका मंजुश्री ओक आणि प्रसिध्द वादकांचा समावेश असणार आहे.
गिरीश पंचवाडकर पुढे म्हणाले की,पुणेकर रसिकांना यमन रागाच्या अनेक रंगानुसार अनेक वैविध्यपूर्ण गाण्यांचा अनुभव घेता येणार आहे. या कार्यक्रमात भावगीत,भक्ती गीत, गझल,नाट्यगीत,लावणी,अभंग,ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग पासून ते कविवर्य मंगेश पाडगावकर,ग.दि.माडगूळकर,
जगदीश खेबुडकर,शांताबाई शेळके अशा मराठीतल्या अत्यंत नामवंत कवीं, गीतकारांची गाणी तसेच साहिर लुधियानवी,शैलेंद्र, गुलजार अशा हिंदीमधील गीतकारांची गाणी सादर केली जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी,हिंदी गाण्यांबरोबरच गिरीश पंचवाडकर यांनी स्वत: रचलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील राग तराणा आणि यमन से नमन ही सरगम तसेच पारंपारिक यमन रागातील बंदिश असा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व पुणेकर रसिकांनी नादसप्तक संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायनाचं कौतुक करावे व या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


