अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. दिनांक ३० आणि ३१ जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये हे साहित्य संमेलन रंगणार आहे. गुरुवार दिनांक ३० जानेवारी सकाळी ११.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मानद सचिव अण्णा थोरात आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कार्यवाह दिलीप गरुड, कोषाध्यक्ष बी.आर माडगूळकर, सहकार्यवाह भरत सुरसे, मुख्य सदस्य मृणाल जैन, विनोद वाघ, मीरा शिंदे, विजय जगताप उपस्थित होते.
राजन लाखे म्हणाले, गुरुवार, दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार असून त्यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय, बालकुमार ढोल पथक, लेझीम पथक इत्यादींचा समावेश ग्रंथदिंडीत असणार आहे. या ग्रंथदिंडीमध्ये तब्बल ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
बालसाहित्यिका स्वाती राजे संमेलनाध्यक्ष म्हणून तर स्वागताध्यक्ष म्हणून राजकुमार चोरडिया उपस्थित राहणार आहेत. डॉ. न. म. जोशी, प्रा. मिलिंद जोशी, आमदार हेमंत रासने, पुनीत बालन, विशाल चोरडिया, शर्व गाडगीळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. बालकुमारांचे कथाकथन, ‘मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा किती महत्त्वाचा आहे, हे मुलांना कसे पटवून द्याल’ या विषयावर माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असेही लाखे यांनी सांगितले.
शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी कथाकथन, बालकुमार काव्य संमेलन लेखक आपल्या भेटीला, निमंत्रितांचे कवी संमेलन या सोबतच बाल नाट्यछटा व बाल एकांकिका आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी चार वाजता साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
—


