पुणे : मराठी माध्यमातील विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजी बोलण्याविषयीचा न्यूनगंड कमी व्हावा, यासाठी नातूबाग परिसरातील आदर्श शिक्षण मंडळी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी श्रीकांत भावे स्मृती करंडक ‘इंग्रजी संवाद स्पर्धेचे’ आयोजन केले जाते. स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष असून बुधवार, दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालय येथे स्पर्धा होणार आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रशांत मते व डी.पी.जोशी यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे आणि बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
प्रशांत मते म्हणाले, भविष्यातील इंग्रजीचे महत्त्व ओळखून कै. श्रीकांत भावे यांनी इंग्रजी भाषेविषयी असलेला विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड घालविण्यासाठी अपार कष्ट घेतले होते. ही स्पर्धा श्रीकांत भावे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केली जाते. यास्पर्धेमुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भिती नाहीशी होत असून आज ते विद्यार्थी सफाईदारपणे इंग्रजी बोलत आहेत, हे या स्पर्धेचे यश आहे.
छोट्या गटासाठी स्पर्धेचे विषय युवर हॅप्पी ईस्ट मेमोरीज, हार्डवर्क और स्मार्टवर्क, इफ आय बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, इफ एलियन ऍक्च्युली लँड ऑन अर्थ, इफ युवर फेवरेट कार्टून कॅरेक्टर मीट यू इन रियल लाईफ असे असणार आहेत. तर मोठ्या गटासाठी एक्सप्लोर लाईफ विथ ट्रॅव्हलिंग टू डिफरंट प्लेस, टेक्नॉलॉजी – द डेथ ऑफ लायब्ररीज, कॅशलेस सोसायटी – युवर थॉट ओन बीइंग कॅशलेस, हाऊ कॅन इंडिया बिकम सुपरपॉवर, अ डे विथ डिजिटल डिटॉक्स असे असणार आहेत.
डी.पी. जोशी म्हणाले, इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी दोन गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन असे देण्यात येणार असून उत्कृष्ट अभिनय, लेखन व दिग्दर्शनासाठी देखील पारितोषिक देण्यात येणार आहे.


