पुणे : महाकुंभमेळ्यातील साधू….वंदे मातरम ची भव्य रांगोळी… विटी दांडू, झोका, भवरा असे रांगोळीतून दाखविलेले पारंपरिक खेळ…जोडवी, मासोळी, पैंजण या पारंपरिक साजाची रांगोळी… अशा एकाहून एक सरस मनमोहक गालिचा रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना राष्ट्रीय कला अकादमी च्या ‘अवघा रंग एक झाला’ या प्रदर्शनातून मिळाली.
राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अमोल कदम स्मरणार्थ अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक मिलिंद सबनीस आणि मुुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक अतुल सोनवणे, रोमा लांडे, मंदार रांजेकर, सुनील सोनटक्के, योगेश गोलांडे, अमर लांडे आणि सर्व प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय कला अकादमीचे २७ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कला साधकांच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा ६ वे वर्ष आहे. विविध विषयांवर २५ रंगबेरंगी रांगोळ्या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. सोमवार दि. २७ जानेवारीपर्यंत पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.