पुणे (दि २७ ): आजच्या युगामध्ये पुरुषांच्या खांद्यालाखांदा लावून महिला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अशाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी १० हजारांच्यावर महिला उपस्थित राहणार असून भव्य हळदीकुंकू कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
आमदार हेमंत रासने आणि सौ. मृणाली रासने यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून या कार्यक्रमाचे अखंडित आयोजन करण्यात येत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “आजच्या काळात स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांच्या सबलीकरणावर कायम भर दिला आहे. गेल्या १० वर्षांपासून या सोहळ्याच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा मिळावी, त्यांना आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा आमचा उद्देश आहे.”
————
*चौकट*
पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगीता भोसले, विश्वकप विजेता महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद आणि साहित्य क्षेत्रासाठी वसुंधरा काशीकर, आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.


