मेडिकल टुरिझम ही भारतासाठी एक मोठी संधी असून यामुळे आरोग्यसेवा,औषधनिर्माण आणि पर्यटन याशिवाय देशांतर्गत निर्माण होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना देखील चालना मिळेल,असे मत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने यांनी व्यक्त केले.त्यामुळे सरकारने या क्षेत्राला अर्थसंकल्पात चालना द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भारतातील अनेक रूग्णालयांना आता जॉईंट कमिशन इंटरनॅशनल सारख्या संस्थांकडून प्रमाणन प्राप्त झाले आहे.त्यामुळे परदेशी रूग्णांचा भारतीय आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक आहे.आंतरराष्ट्रीय प्रमाणन असलेल्या आरोग्यसेवा पुरवठादारांकडे उपचार घेऊ पाहणाऱ्या परदेशी रूग्णांसाठी पेमेंट गेटवेज् चे सुसूत्रीकरण,परदेशी रूग्णांसाठी व्हिसा प्रोसेसिंग शुल्कामध्ये कपात अशा अनेक गोष्टी करता येतील.प्रक्रिया आणि वित्तीय नियमनांसाठी आरोग्य सेवा आणि विमा प्रदाता संस्थांना एकत्र घेऊन सरकार या सर्व प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणू शकते.
आरोग्य सेवा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग
भारतातील रूग्णालयांनी रोबोटिक्स आणि एआय यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर याआधीच सुरू केला आहे.एकीकडे सतत उभरते तंत्रज्ञान आणि नवीन उपकरणांमध्ये मोठी गुंतवणूक करून त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागते,तर दुसरीकडे सामान्य लोकांना ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल,हे तितकेच महत्त्वाचे आहे.म्हणूनच आयात होणाऱ्या निदान व इतर वैद्यकीय उपकरणांवर शुल्क कपात केल्यास यात मदत होऊ शकते.
एकंदरच आरोग्यसेवेकडे आर्थिक भार म्हणून न पाहता मोठी संधी या दृष्टीने बघितल्यास आपण लोक कल्याणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकतो,त्यामुळे आरोग्य सेवा,ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा यासाठी अधिक तरतूद करणे फायद्याचे ठरेल.
—


