सन 1968 -69 आणि सन 1970 मध्ये आत्ताच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती व पुरातत्व विभाग तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर येथील उत्खनन शाखेच्या संयुक्त माध्यमातून पवनी , जिल्हा भंडारा येथे पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले. या उत्खननात जगन्नाथ टेकडी स्तूप, चांडकापूर टेकडी स्तूप, आणि हरदोला ला टेकडी स्तूप दिसून आले आणि जगाचे बुद्धिस्ट पुरातत्वीय साईट कडे लक्ष वेधले गेले.
. सिंध पुरी येथे महासमाधीभूमी, कोरंबी येथील बौद्ध लेणी तसेच जवळच कोका, आणि करांडला व्याघ्र प्रकल्प, गोसे खुर्द राष्ट्रीय सिंचन शj प्रकल्प या भागात आहेत. याव्यतिरिक्त नैसर्गिक सौंदर्यानी नटलेली वनसंपदा पर्यटक व भाविकांचे लक्ष आकर्षित करीत आहे. या भागाच ब्रॅण्डिंग अन मार्केटिंग झाले तर या भागात मोठे पर्यटन स्थळ विकसित होऊ शकते.
भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात पवन राजाच्i किल्ला पर्यटकांचे स्वागत करतो. हे स्थळ भंडारा या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 47 किलोमीटर व नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानी पासून 82किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर प्राचीन वस्तीवर वसलेले असून या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले तर महत्त्वपूर्ण बुद्धिस्ट पुरातत्त्विक अवशेष सापडू शकतात ,कारण अनेक वेळा नांगर टी मध्ये खापरे व विटांचे ढिगारे सापडतात. हे शहर वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले असून अलीकडे झालेल्या उत्खननात पवन राजाचे पद्मावती नगर असावे असे पुरावे हाती लागलेले आहेत. मध्य भारतातील ,,काशी ,,म्हणून पवनीची ओळख आहे. येथे विविध देवतांची 354 मंदिरे असून त्यातील काही मंदिर उत्सव यात्रेसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक मंदिराजवळ गरुड खांब असून त्यावर सुंदर नक्षी काम झालेले दिसते .येथे बारा दगडी खांब आहेत. येथील स्तूपावर बौद्ध संस्कृतीचे प्रतीके दिसून येत असल्यामुळे हे एक बौद्ध वारसा स्थळ आहे . पवनीला व्यापारी महत्त्व होते. ते दक्षिण भारत व उत्तर भारताला जोडण्याचे केंद्रीय ठिकाण होते. येथे उत्खननात मिळालेले शिल्प ,अवशेष नॅशनल म्युझियम नवी दिल्ली, मुंबई तसेच नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
चिनी प्रवाशी युवान चॉंगच्या नोंदीप्रमाणे प्राचीन पवनी बौद्ध संस्कृतीचे भरभराटीस आलेले महत्त्वाचे प्रभावशाली केंद्र होते. येथील उत्खननावरून हे नगर इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन पहिल्या शतकात बौद्ध संस्कृतीचे केंद्र होते येथील स्थापत्यकंन मौर्य, शृंग ,सातवाहन राज्य काळा नुसार विस्तृत होत गेले.
सर्वप्रथम 1887 मध्ये हेनरी कजिन्स यांनी पवनी येथील पुरातत्त्व स्थळाची नोंद केली. त्यानंतर जॉन मार्शल ,सर कनिंगहम यांनी देखील याची नोंद घेतली. सन 1936 मध्ये पवनीच्या हरदोला ला टेकडी जवळ अभिलेखन शीला प्राप्त झाली आणि बौद्ध वारसा समजण्यात मदत मिळाली. सन 1936 मध्ये जी. सी .चंद्रा यांनी हरदो लाला टेकडी व जगन्नाथ टेकडी मध्ये स्तूप असावेत असा अंदाज वर्तवून आपला वार्षिक अहवाल रावबहादूर के. एन .दीक्षित यांच्याकडे पाठविला याचा परिणाम असा झाला की भारतीय पुरातत्त्व विभागाने ही साईट संरक्षित केली. सन 1964 मध्ये महा छत्रप रुपी अम्मचा छायास्तंभ, आणि वाकाटक राजा द्वितीय यांच् ताम्रपट मिळाला .त्यामुळे पुरातत्व विभागाने पवनी कडे आपले लक्ष केंद्रित केले. सन 1969 मध्ये जगन्नाथ टेकडी शेजारी शेती नांगरताना स्थानक मुद्रेतील यक्ष प्रतिमा व अभिलेखित असलेल्या बौद्ध धम्म स्तूपाच्या वेदिका स्तंभाची प्राप्ती झाली.
…. जगन्नाथ टेकडी स्तूप…
हा स्तूप जगन्नाथ टेकडीच्या थोड्या दूर बाल समुद्र तलावाच्या दक्षिणेकडील परिसरात असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या परिसरात आहे. या परिसरातील ढिगार्यातअनौपचारिक शेतीच्या कामात कोरीव बुद्ध प्रतिमा भाविकांच्या मानवी शिल्पासह ,काही रेलिंग स्तंभ आणि मौर्य ब्राह्मी लिपीतील शीला लेखासह एक मोठा पाषाण मिळाला . मूळ स्तूप 38.20 मीटर व्यासाचा विटांनी बांधलेला होता. मूळचा स्तूप सम्राट अशोक पूर्व काळात बांधला होता. जगन्नाथ मंदिर अलीकडील काळातील असून हे मंदिर बांधण्यासाठी स्तुपावरची जागा सपाट केली गेली. त्यामुळे उंचीचाअंदाज बांधता आला नाही . स्तूप बांधणी करिता भाजलेल्या विटा वापरल्या गेल्या .बांधकाम पेटीका पद्धतीने झाले होते. मूळ स्तूप नंतरच्या काळात बंदिस्त करण्यात आले . प्रदक्षिणा पथ तीन वेळा बांधला होता. पण सध्या दक्षिणा पथ दिसून येत नाही. स्तूपाच्या शेवटच्या टप्प्यात चार मुख्य दिशांना प्रवेशद्वार असलेली दगडी रेलिंग जोडण्यात आली होती. स्तूपाच्या रेलिंग आणि घुमटाची दुरुस्ती इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत सुरू होती. त्यामुळे पवनी परिसरातील संपूर्ण स्तूप संकुल इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या प्रारंभ पासून ते तिसऱ्याशतकापर्यंत सुरू राहिलेले दिसते. महावंश या बौद्ध ग्रंथात वर्णित केल्याप्रमाणे स्तूपाचीनिर्मिती झाली होती. शृंग ,सातवाहन काळा तील दुसऱ्या स्तरात मूळ स्तूपाच्या व्यासाला तीन पॉईंट वीस मीटरने वाढविले गेले .या काळापर्यंत लाकडी वेदिका होती ती नंतर नष्ट झाली स्तूपाजवळ छत्रावलीच् तुकडा मिळाला .तिसऱ्या स्तरात लाकडी वेदीके ऐवजी पाषाण वेदिका स्तंभ व तोरण द्वार लावले गेले. या प्रकारचे अवशेष भरहुत, सांची, सतधारा येथे आढळते .,येथील शिल्पकामात त्रिरत्न बोधी वृक्ष, चैत्य,धम्मचक्र ,वज्रासन, मुछलींद नाग, आदी हीनयांनी बौद्ध प्रतीकांचा वापर झालेला आहे. येथे साक्यमुनी बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना कोरल्या आहेत.
……चांडकापूर टेकडी स्तूप…..
जगन्नाथ स्तूपाच्या दक्षिणे स सुमारे दीड किलोमीटर अंतरावर चांडकापूर परिसरातील सुलेमान टेकडीवर आणखी एका स्तूपाचे अवशेष मिळाले, उत्खनन करणाऱ्यांनी या टेकडीचा उल्लेख चांडकापूर असा केला .गोलाकार असलेल्या टेकडी मधील स्तूप आठ मीटर उंच आहे. हा स्तूप कच्च्या व भाजलेल्या विटांनी निर्मित केलेला होता. सन 1970 च्या प्रारंभिक या टेकडीचे उत्खनन केले गेले. त्यावेळी सुलेमान टेकडीची उंची सुमारे नऊ मीटर होती. या स्तूपाभोवती शेतीच्या कामासाठी नांगरणी केली गेली आणि परिसर सपाट करण्यात आला या टेकडीवर जगन्नाथ टेकडी प्रमाणे कोणत्या ही प्रकारची वास्तू बांधलेली नव्हती त्यामुळे स्तूपाचे अवशेष अखंड स्वरूपात मिळाले .
या स्तूपाची गणना भारतामधील महास्तुपामध्ये करता येते स्तूपाच्या मधोमध सुमारे आठ मीटर खोलीवर विटांनी बांधलेले कुंडाकृतीत मातीचे भांडे सापडले या मातीच्या भांड्यात मानवी हाडांचे व दानाचे अवशेष मिळाले या अस्थिपात्रावर कच्च्या व पक्क्या विटांच् एक थर देऊन तो भाग बंद केला होता अशा प्रकारचे भांडे दुसरीकडे भारतात सापडले नाही. यावरून स्तूपात प्रमुख बौद्ध भिक्खूंच्या अस्थी जतन करण्यासाठी तो बांधण्यात आला असावा ,जसे साची स्तूपात महास्थवीर महामुगल्यान व , सारी पुत्त यांच्या अस्थि सापडतात. परंतु हा स्तूप कोणाच्या अस्थिवर बांधण्यात आला . ते अजून समजले नाही . उत्खननात सापडलेल्या नाण्याच्या आधारावर स्तूपाचा काळ इसवी सन पूर्व पहिले शतक समजावे या स्तूपाभोवती प्रदक्षिणा पथ मिळाले नाही सध्या स्तूपाच्या बाजूला बोधी वृक्ष लावण्यात आला आहे.
……. हरदोलाला टेकडी स्तूप…..
हरदौलाला टेकडी पवनीच्या बाहेर वायव्य दिशेला सुमारे एक किलोमीटर लांब वर एक अर्ध गोलाकार स्तूप सदृश्य उंचवटा असून त्याला हरदोला टेकडी म्हणतात. इसवी सन 1938 मध्ये शासनाने ही टेकडी संरक्षित म्हणून जाहीर केली परंतु उत्खननात हा स्तूप विटांच् आढळला नाही तर हा मातीच् स्तूप म्हणून आढळला आहे. टेकडी च् आकार स्तूपाच्या अंडा सारखा आहे. या परिसरात लाल मुरूम आढळतो या टेकडीच्या पश्चिम उतारावर इंग्रजी एल आकाराची दहा मीटर लांब व पाच मीटर रुंद अशी एक खंती घेण्यात आली .यात असे आढळून आले की दगड ,चुना आणि विविध प्रकारच्या मातीचे भरण टाकून उंचवटा निर्माण करण्यात आला .मात्र या परिसरात विटांचे भरपूर तुकडे सापडतात वीट अखंड दिसून आली नाही. विटांची जाडी सात सेंटीमीटर होती. या पाच मीटरच्या परिसरात काही दगड स्तंभाचे अवशेष प्राप्त झाले. एक दगडी स्तंभ एक मीटर लांब सहा सेंटीमीटर जाळीचा होता .उत्खननात रेताळदगडाच् स्तंभ प्राप्त झाले .यावर नक्षीकाम असून या आधारे स्तंभा काळ इसवी सन आठवे, 9 वे शतक असा निश्चित करण्यात आला म्हणजे याआधी येथे स्तूप असला पाहिजे आणि नंतर तो उध्वस्त झाला असावा हर दोलाच्या पश्चिम भागात ज्या ठिकाणी मैदान आहे या ठिकाणी 1935 मध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ.व्ही.व्ही. मीराशी यांना राजा भागदत्ताचा शिलालेख मिळाला .यात पादुका पट्टाचा उल्लेख आहे याचा संबंध या स्तूपाशी असावा या ठिकाणी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील एक तांब्याचे नाणे व एक छाया स्तंभ मिळाला. यावरून हे उद्देशिका स्तूप असावे. जगन्नाथ स्तूप व चांडकापूर स्तूप यांच् काळ सारखा असून दोघांचे महत्त्व सारखे आहे.परिसरांचे आणखी उत्खनन झाले तर आणखी पुरावे सापडून या भागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. या ठिकाणी शेतातून जावे लागते. या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून स्तूपाच्यावर पूजा केली जाते .
…. महा समाधी भूमी महाविहार….
सिंधपुरी येथे महासमाधीभूमी महाविहार आहे. महा विहाराचे उद्घाटन डॉ. भदंत आनंद कौशल्यायन आणि सोमेन होरिसावा जी जपान यांच्या उपस्थित झाले होते या विहाराचे संचालन इंडो जापान बुद्धिस्ट फ्रेंड्स असोसिएशन चे भंते संघरत्न मानके जी यांच्यामार्फत उत्कृष्ट रितीने सुरू आहे. संस्थेतर्फे भंडारा जिल्ह्यात व जगभरात विविध प्रकल्प राबविले जातात या विहाराची स्थापना वैनगंगा नदीच्या तटावर करण्यात आली त्यामुळे विहार मनमोहक दिसते विहाराचे क्षेत्र सहा एकराच्या विशाल परिसरात असून सर्वत्र वनराईने फुललेले आहे विहार हे वास्तुकलेच एक उत्कृष्ट उदाहरण असून विहारात तथागत गौतम बुद्धाच्या जीवन चरित्रावर आधारित चित्र साकार केली आहेत .विहारात आल्यावर धार्मिक भावना निर्माण होऊन शांतीचा लाभ मिळतो. दरवर्षी विहाराच वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .त्यावेळी देश विदेशातील हजारो भाविक येथे येऊन तथागताच्या मूर्ती समोर नतमस्तक होतात. यावेळी उत्सवाचे आणि जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते धार्मिक ,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाविहारात असलेली ध्यानी बुद्ध प्रतिमा उपस्थिततांना आकर्षित करते. हे महाविहार स्तूपाबरोबरच महत्त्व पूर्ण ठरलेलेआहे..
दिनांक 3 फेब्रुवारी 1969 या दिवशी पवनी येथे उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते आणि पवनी नगरीची ओळख बुद्ध नगरी म्हणून झाली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून हा दिवस स्तूप संवर्धन समिती ,पवनी तर्फे पुनरुत्थान दिन म्हणून साजरा केला जातो. स्तूप परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. देश विदेशातील भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. पवनी येथे मिळून आलेल्या स्तूपांचे महत्त्व भारतातील इतर स्तुपाच्या समकक्ष आहे.