Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटलमध्ये स्टोमा केअरसाठी समर्पित ओपीडी सुरू जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून...

नोबल हॉस्पिटलमध्ये स्टोमा केअरसाठी समर्पित ओपीडी सुरू जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून उद्घाटन

पुणे,5 फेब्रुवारी 2025 : जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे स्टोमा केअरसाठी पुण्यातील पहिले समर्पित ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ऑस्टोमी रूग्णांसमोर असलेल्या शारीरिक व भावनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी एक समग्र सेवा उपलब्ध होण्याच्या दिशेने या वैशिष्टयपूर्ण सुविधेची रचना करण्यात आली आहे.अद्ययावत सोल्युशन्स आणि समर्पित रूग्ण साहाय्यासह पुण्यातील स्टोमा केअरमध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित करण्याचे नोबल हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे. उद्घाटन प्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, संचालक डॉ.दिविज माने,संचालक एस.के.राऊत, कर्करोग तज्ञ डॉ.आशिष पोखरकर, शल्यचिकित्सक डॉ.उमेश पप्रुनिया, मुत्ररोगतज्ञ डॉ.विक्रम सातव आणि शल्यचिकित्सक डॉ.अभिजित व्हाटकर यांसह कोलोप्लास्ट वैद्यकीय व्यवस्थापक डॉ.रिंकी मनसुखानी,क्षेत्रीय व्यवस्थापक प्रविण शिंगरे व साहिम सिद्दिकी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोठ्या आतड्याचा कर्करोग,मुत्राशयाचा कर्करोग,आतड्यांमधील अडथळे,अपघातांमुळे आतड्यांना झालेली ईजा यासाठी करण्यात आलेल्या जीवनदायी शस्त्रक्रियांदरम्यान पोटाच्या भिंतीमध्ये तात्पुरते किंवा कायमस्वरूपी तयार केलेले छिद्र म्हणजेच स्टोमा.याचा वापर शरीरातून मलमूत्र बाहेर काढण्यासाठी केला जातो.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील कर्करोग तज्ञ डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की,रोगाच्या स्वरूपानुसार मलमूत्र बाहेर काढण्यासाठी तात्पुरते किंवा कायम स्वरूपी छिद्र तयार केले जाते.या छिद्राला मलमूत्र संकलनासाठी हवाबंद पिशवी बसविली जाते. त्याचबरोबर स्कीन फिल्मस्‌‍,चिकट पेस्ट आणि बेसप्लेट यासारखे स्टोमा उपकरण या भिंतीला सुरक्षितपणे बांधले जातात.मात्र याचे व्यवस्थापन नीट न झाल्यास यातून गळती होऊ शकते आणि त्वचेच्या समस्या,दुर्गंध आणि हर्निया,प्रोलॅप्स यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.यामुळे लोकांमधील वावर हा अवघड होत जातो आणि आत्मविश्वास कमी होतो.एकंदर जीवनाच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,योग्य प्रशिक्षण आणि स्टोमा केअर तज्ञांशी वेळेवर संवाद साधून अशा परिस्थिती टाळता येऊ शकतात.म्हणूनच केवळ रूग्णांना नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही या उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण देणे आणि वेळेवर बदलण्याची गरज ओळखण्याबाबत माहिती देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.प्रत्येक कर्करोग रूग्णाचा प्रवास हा अद्वितीय असतो आणि प्रत्येक रूग्णाला स्टोमा केअर तज्ञांचा दशकांचा ज्ञानाचा आणि समस्या निराकरणाचा फायदा शारीरिक आणि भावनिकदृष्टया होऊ शकतो.

डॉ.आशिष पोखरकर पुढे म्हणाले की,या क्लिनिकमध्ये स्टोमा केअरसाठी प्रशिक्षित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे,जी प्रत्येक रूग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिकृत सेवा प्रदान करतात.स्टोमा केअर उत्पादने आणि सोल्युशन्स क्षेत्रातील जगातील आघाडीची संस्था असलेल्या कोलोप्लास्टच्या सहयोगाने या ओपीडीच्या माध्यमातून प्रगत उपचार पर्याय प्रदान केले जातील.तसेच रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रवासात अधिक सक्षम करण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन प्राप्त होईल.

डॉ.दिविज माने म्हणाले की,जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून या ओपीडीचे उद्घाटन रुग्ण केंद्रित सेवेला प्राधान्य देण्याचे रूग्णालयाचे ध्येय अधोरेखित करते. या माध्यमातून स्टोमाचे व्यवस्थापन करणाऱ्या रूग्णांना सक्षम करत त्यांच्या जीवनमानावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे शल्यचिकित्सक डॉ.उमेश पप्रुनिया म्हणाले की,रूग्णांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सल्ला आणि उपचार याच्या माध्यमातून समर्पित सुविधा प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,हा अद्वितीय उपक्रम रूग्णसेवेमध्ये सातत्याने सुधार करण्याची आमची कटिबद्धता दर्शवित स्टोमा रूग्णांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments