पुणे: पूना कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती, पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे यावेळी प्रदान करण्यात आली.
अंजुमन खैरूल इस्लाम संस्थेचे सचिव मा. डॉ. हानी अहमद फरीद व संस्थेचे विश्वस्त डॉ. हनीफ लकडावाला प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
डॉ. हानी अहमद फरीद म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचा विकास करून समाजासमोर आदर्श निर्माण करायला हवा. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
डॉ. हनीफ लकडावाला म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न होता, उद्योजक बनून इतरांना नोकऱ्या देणारे व्हावे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन केंद्राची स्थापना करून मूल्य शिक्षण रुजवण्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला.
प्राचार्य डॉ. इकबाल शेख यांनी महाविद्यालयाच्या वर्षभराच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. इस्माईल शेख, उपप्राचार्य प्रा. इम्तियाज आगा, पर्यवेक्षिका प्रा. नसीम खान, क्रीडा संचालक डॉ. अयाज शेख, क्रीडा शिक्षक प्रा. अशद शेख, प्रा. इमरान पठाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी शेख आशद व महिला कार्यक्रम अधिकारी वसुधा व्हावळ तसेच विविध विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीन शेख, डॉ. फाजील शरीफ, डॉ. नसरीन खान आणि प्रा. शाहिन कुरेशी यांनी केले. जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. मुशर्रफ हुसेन यांनी आभार मानले.


