या मॅरेथॉन स्पर्धेद्वारे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलणार!
पुणे, ७फेब्रुवारी २०२५: साई जनसेवा प्रतिष्ठान आयोजित व ब्लु ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संकल्पेनेतून “हिरकणी महिला मॅरेथॉन २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी बाबुराव सणस मैदान या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे व गीता मोहोरकर यांनी सांगितले की, साई जनसेवा प्रतिष्ठान गेली १५ वर्षे अनाथ, अंध, अपंग आणि वंचित घटकांसाठी कार्यरत असून, आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत आहे. संस्थेच्या या सेवाभावी कार्याचा एक भाग म्हणून, आम्ही “हिरकणी महिला मॅरेथॉन २०२५” चे आयोजन करत आहोत. हा उपक्रम महिलांना एकत्र आणण्याचा, त्यांना प्रेरित करण्याचा आणि समाजात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आहे.
ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून, महिलांची एकजूट आणि सशक्तीकरण यांचा एक सण आहे. विशेष म्हणजे, या मॅरेथॉनच्या तिकिटाच्या ५०% रक्कम अनाथ मुलींच्या भवितव्यासाठी आणि एच.आय.व्ही. ग्रस्त मुलं-मुलींसाठी मदत म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम समाजसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे हीच आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्लु ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशनचे अजय देसाई यांनी सांगितले की, ही मॅरेथॉन महिलांसाठी त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा एक सुंदर अनुभव ठरणार आहे. महिलांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखावेत, आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अवलंब करावा आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा, यासाठी हा उपक्रम आहे. तुम्ही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपल्या सामर्थ्याचा आणि इच्छाशक्तीचा एक अनोखा संदेश द्या. हि स्पर्धा ३किमी, ५किमी, १०किमी व २१ किमी अशा चार प्रकारात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक, गुडी बॅग, टायमिंग चिप, नाश्ता, हायड्रेशन, रुट सपोर्ट आणि ई-प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक असून नावनोंदणीसाठी अजय देसाई(9766353337) यांच्याशी अथवा www.bluebrigade.club या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


