पुणे,6 फेब्रुवारी २०२५ : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे कर्करोग दिनानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत सकाळी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. केईएम हॉस्पिटलपासून निघालेल्या या रॅलीचा मार्ग केईएम हॉस्पिटल गेटपासून एसव्ही युनियन हायस्कूल – नरपतगिरी चौक – अपोलो हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल असा होता. यामध्ये केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टर्स,परिचारिका,कर्मचारी आणि व्यवस्थापन तसेच कर्करोगातून बरे झालेले रूग्ण यांसह ४५० हुन अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये अगदी दोन वर्षे इतके छोटे रुग्ण,त्यांचे पालक व कुटुंबीय व इतर रुग्ण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उपक्रमाचे उदघाटन वैद्यकीय सामाजिक विभागाच्या माजी प्रमुख एच.जी.मनसुखानी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. राकेश शहा, वैद्यकीय प्रशासक डॉ. विश्वनाथ येमूल, पेडियाट्रिक हेमॅटॉलॉजिस्ट डॉ. सरिता कोकणे यांसह लायन्स क्लब चे अध्यक्ष ललितकुमार धोका आदी मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम केईएम हॉस्पिटलच्या प्रेरणा सपोर्ट ग्रुपचा भाग होता. प्रेरणा सपोर्ट ग्रुप हा कर्करोग ग्रस्त मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी असून याची स्थापना १९९४ साली झाली होती.एकमेकांचे अनुभव सांगणे,तज्ञांचा सल्ला,मार्गदर्शन व पाठपुरावा आणि एकमेकांस साहाय्य करणे हे या सपोर्ट ग्रुपचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमामध्ये केईएम हॉस्पिटल पुणे च्या हेमॅटॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कनन सुब्रमण्यम यांनी प्रेरणादायी संदेश दिला,याशिवाय देणगीदार श्री. व सौ. सचिन कुमार व कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच याआधी उपचार पूर्ण करणारे आणि आता दहावी व बारावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
केईएम हॉस्पिटल पुणे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या की, या उपक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांचा प्रचंड सहभाग, कर्मचारी आणि रुग्णांमधील जे उपचारांच्या पलीकडे जाणारे दृढ नाते प्रतिबिंबित करते. आमचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते उपचारानंतरही या मुलांच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर लक्ष ठेवत आहेत.या उपक्रमात सहभागी होऊन जागरूकता निर्माण केली आणि लवकर हस्तक्षेप करून कर्करोगाशी लढण्यासाठी इतरांना प्रेरित केले याबद्दल आम्ही आज सहभागी झालेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
केईएम हॉस्पिटल पुणे चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. राकेश शहा म्हणाले की ‘युनाइटेड बाय युनिक’ जागतिक कर्करोग दिनाची यावर्षीची संकल्पना असून कर्करोगाशी लढा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाच्या वेगळेपणावर भर देते. प्रेरणा सपोर्ट ग्रुप व्यक्तींना त्यांचे विविध अनुभव इतरांना सांगण्यासाठी , एकत्र येण्यासाठी आणि कर्करोग विरुद्धच्या लढाईत इतरांना प्रेरित करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. या रॅलीचे उद्दिष्ट लवकर निदान आणि वेळेवर उपचारांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.