विवाहपूर्व समुपदेशनाची आज मोठ्या प्रमाणात गरज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने विवाहपूर्व समुपदेशन आणि शिक्षणावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

तारां कित Avatar

पुणे : राष्ट्रीय महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतात त्यात ४० ते ५० टक्के तक्रारी कौटुंबिक तक्रारी, पती-पत्नी मधील भांडणे हिंसा अशा असतात. पोलिस त्यांना शक्य तितक्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्यावर देखील खूप ताण असतो. या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी लग्न आधीचे समुपदेशन गरजेचे आहे. कुटुंब आणि लग्न संस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. कुटुंब व्यवस्था तुटत आहे. भारतीयतेचा विचार, विवाहाची कल्पना पती पत्नीच्या भांडणामुळे तुटत आहे. हे सांभाळून मजबूत करणे आज गरजेचे आहे. त्यामुळे विवाह पूर्व समुपदेशनाची मोठ्या प्रमाणात आज गरज आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने विवाहपूर्व समुपदेशन आणि शिक्षणावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आपटे रस्त्यावरील हाॅटेल रामी ग्रॅंड येथे करण्यात आले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश व्हिक्टोरिया गौरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यावेळी उपस्थित होत्या. देशभरातील वकील, न्यायाधीश, स्वयंसेवी संस्था आणि समुपदेशक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

विवाहासाठी भावनिक आणि आर्थिक तयारी, संवाद कौशल्ये आणि मतभेद सोडवण्याच्या पद्धती, गृहहिंसेविरोधी कायदेशीर अधिकार आणि संरक्षण, शैक्षणिक संस्थांमध्ये विवाहपूर्व समुपदेशनाचा समावेश या विषयावर परिषदेत चर्चा करण्यात आली.

व्हिक्टोरीया गौरी म्हणाल्या, आपली संयुक्त कुटुंब प्रणाली जवळपास नष्ट झाली आहे. ते टिकविण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. विवाह जीवनातील गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी, जोडप्यांमध्ये मोकळा संवाद, भावनिक गरज आणि नाते संबंध सन्मानपूर्वक सुदृढपणे टिकवण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे. विवाह ही एक सुंदर संस्था आहे. विवाहपूर्व समुपदेशन हा प्रतिबंधात्मक उपाय नाही, तर वैयक्तिक वाढीसाठी, निरोगी संवादाला चालना देणारा आणि जोडप्यांमधील बंध मजबूत करणारा एक विधायक मार्ग आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts