वेदांताचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी आपल्या भागधारकांना पाठवलेल्या पत्रात कंपनीचे उत्पन्न, महत्त्वपूर्ण खनिजांवरील दृष्टिकोन आणि भविष्यातील वाटचाल यावर प्रकाश टाकला. त्यांनी आर्थिक शिस्त, शाश्वतता, प्रस्तावित विघटन (डिमर्जर) आणि भागधारक मूल्य वचनबद्धता याबाबत असलेल्या कंपनीच्या बांधिलकीवरही भर दिला.
भारतातील आर्थिक विकासासाठी नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व आणि त्याचा कसा उपयोग होऊ शकतो यावर भाष्य करताना अगरवाल म्हणाले, “खनिज व नैसर्गिक संसाधन क्षेत्राने जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांच्या वाढ आणि विकास धोरणात अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे: उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, चीन आणि ऑस्ट्रेलिया ही याची उत्तम उदाहरणे आहेत. आतापर्यंत फक्त 20% हून कमी खनिजस्त्रोतांचा शोध लागलेला आहे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रावर वाढता भर दिला जात आहे. त्यामुळे भारतासाठी हीच योग्य वेळ आहे.”
तिसऱ्या तिमाहीसाठी, वेदांताने EBITDA 11,284 कोटी रु. नोंदवला. करपश्चात नफा (Profit After Tax) मागील वर्षाच्या तुलनेत 70% अधिक 4,876 कोटी रु. आहे. तसेच, कंपनीने सात तिमाहींमधील सर्वात कमी निव्वळ कर्ज ते EBITDA गुणोत्तर 1.4x नोंदवले.
अगरवाल यांनी वेदांताच्या मूल्य निर्मिती आणि शाश्वततेसाठीच्या बांधिलकीबाबतही चर्चा केली. “महत्वाच्या सर्व मापदंडावर आपला व्यवसाय मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि आमच्या चिकाटीमुळे आम्ही आमच्या भागधारकांना अतुलनीय मूल्य प्रदान करणे सुरू ठेवले आहे,” असे ते म्हणाले.
“ज्यांनी कोणी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीच्या सुरुवातीला वेदांतामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना या कालावधीत त्यांच्या गुंतवणुकीत 4.7 पट हून अधिक वाढ बघायला मिळाली आहे. भांडवली वाढ आणि लाभांश अशा दोन्ही प्रकारे ही वाढ झाली आहे. येथे 81% चे लाभांश उत्पन्न हा वेदांताचा सर्वात मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे,” ते म्हणाले.
भारताची महत्त्वपूर्ण खनिजांसाठीची मागणी वाढत आहे. अगरवाल यांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठीच्या वेदांताच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि कंपनीच्या प्रस्तावित डीमर्जरबाबत विश्वास व्यक्त केला.
“वेदांता लवकरच आपल्या वित्तपुरवठादार आणि भागधारकांकडून प्रस्तावित डिमर्जर योजनेसाठी अंतिम मंजुरी घेण्याचा प्रयत्न करेल. डिमर्जरनंतर, प्रत्येक वेदांता भागधारकाला वेदांता अॅल्युमिनियम, वेदांता ऑईल अँड गॅस, वेदांता पॉवर आणि वेदांता स्टील अँड फेरस मेटल्स या नव्याने वेगळ्या झालेल्या 4 कंपन्यांमध्ये प्रत्येकी 1 अतिरिक्त समभाग मिळेल. या प्रक्रियेमुळे वेदांताचा गुंतवणूकदार वर्ग मोठ्या प्रमाणावर विस्तारित होईल आणि नवीन गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीनुसार या कंपन्या आणि संबंधित उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.” असे अगरवाल यांनी म्हणले आहे.


