Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘’इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स’’च्या १०व्या आवृत्तीचे आयोजन

मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘’इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स’’च्या १०व्या आवृत्तीचे आयोजन

मुंबई, १८ फेब्रुवारी-भारतातील नाविन्यपूर्ण संशोधनाला पाठबळ देणाऱ्या मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन (एमआयएफ) तर्फे ‘इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स २०२५’ या दहाव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हा मंच सध्या प्रकाशझोतात नसलेल्या परंतु, भविष्यात क्रांतिकारी ठरू शकणाऱ्या नवकल्पनांचा ओळख मिळवून देतो. ६ मार्च २०२५ रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला पार पडणाऱ्या या भव्य सोहळ्यात १००० हून अधिक दिग्गज नेते, उद्योजक, गुंतवणूकदार आणि नवनिर्माते सहभागी होणार आहेत.

गेल्या दोन दशकांपासून, इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स हा मंच नाविन्यपूर्ण कल्पनांना मुख्य प्रवाहात येण्यापूर्वीच ओळखून त्यांना महत्व मिळवून देणारे व्यासपीठ बनला आहे. एकमेवाद्वितीय असलेल्या या उपक्रमाच्या मागील ९ आवृत्त्यांमध्ये आतापर्यंत ६५ हून अधिक नाविन्यपूर्ण संकल्पनांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली असून त्यांचा सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे.

यावर्षीच्या १० व्या विशेषतम आवृत्तीत दूरसंचार, अवकाश तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, उत्पादन क्षेत्र, सहाय्यक तंत्रज्ञान आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांतील सात उत्कृष्ट नवकल्पनांना गौरविण्यात येणार आहे. १००० हून अधिक सहभागींमधून या ७ नवकल्पनांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विजेते टेड-स्टाईल चर्चांद्वारे त्यांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर सादर करता येईल, ज्यामुळे उपस्थितांना त्यांच्या कल्पनांचा, दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा थेट प्रत्यय येईल.

‘’भारताच्या नवसंकल्पनात्मक परिसंस्थेमध्ये मोठी वाढ होत आहे, जिथे उद्योजक आणि नवनिर्माते स्थानिक आणि जागतिक स्तरावर प्रभाव टाकणाऱ्या उपाययोजना तयार करत आहेत. या मंचाच्या १०व्या आवृत्तीचा उत्सव साजरा करताना, आम्ही उद्योगाची व्याख्या बदलणाऱ्या आणि नवसंकल्पनांचे नवे प्रवाह निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करत आहोत”, असे मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक हर्ष मारीवाला म्हणाले.

भारत सध्या जलद आर्थिक वाढ आणि शाश्वततेच्या आव्हानांच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशा वेळी, नाविन्यपूर्ण संशोधनांना ओळख मिळवून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स या मंचाद्वारे, पारंपरिक व्यवसाय पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संकल्पनांना संधी दिली जाते. पारंपरिक पुरस्कारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने, नाविन्यपूर्ण संशोधनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा एकमेव मंच आहे.

‘’मॅरिको इनोव्हेशन फाऊंडेशनचा हा कार्यक्रम प्रत्येक दोन वर्षांनी आयोजित होतो, जो नवसंकल्पनांना प्रसिद्धी मिळवून देणारे व्यासपीठ ठरला आहे. या कार्यक्रमामुळे प्रत्येक वेळी लोकांमध्ये आशावाद आणि उत्साह निर्माण होतो, कारण ते नाविन्यपूर्ण संशोधनांचा प्रभाव प्रत्यक्षरित्या पाहू शकतात. या नव्या ओळखीमुळे, परिवर्तन घडवणाऱ्या कल्पनांच्या वाढीस गती देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळाले आहे, असे मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या प्रशासक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अमित चंद्र यांनी सांगितले.

इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स २०२५ चे विजेते केवळ पुरस्कारच नाही तर विविध प्रकारचे सहाय्य मिळवणार आहेत, यात डिजिटल आणि पीआर प्रसिद्धी, कार्यकारी प्रशिक्षण (एक्झिक्युटिव्ह कोचिंग), विशेष स्टोरीटेलिंग प्रशिक्षण, मुंबई येथे एप्रिल २०२५ मध्ये पार पडणाऱ्या एमआयएफच्या इनोविन डेमध्ये मध्ये सहभागाची संधी इत्यादींचा समावेश आहे. इनोविन डे या उपक्रमाद्वारे, विजेत्यांना गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी आणि अनुदान देणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. याशिवाय, पात्रतेच्या निकषांनुसार, विजेते एमआयएफच्या नो-इक्विटी एक्सलरेटर प्रोग्राम ‘स्केल उप’ साठी पात्र ठरू शकतात.

मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या प्रमुख सुरंजना घोष म्हणाल्या की, “इंडियन इनोव्हेशन आयकॉन्स हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर देशातील नाविन्यपूर्ण संशोधकांसाठी एक व्यासपीठ आहे. या मंचाद्वारे आम्ही नाविन्यपूर्ण संशोधक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि समाजपरिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणून नाविन्यपूर्ण कल्पनांचा विकास आणि वाढ सुनिश्चित करत आहोत. या १०व्या विशेष आवृत्तीचा उत्सव साजरा करत असताना, आम्ही या मंचाच्या गौरवशाली इतिहासाकडे पाहत आहोत आणि भविष्यातील अधिक मोठ्या प्रभावासाठी सज्ज होत आहोत.”

२०२३ मध्ये झालेल्या मागील आवृत्तीत, सहा उत्कृष्ट नवसंकल्पनांचा सन्मान करण्यात आला होता, ज्यात ध्रुव स्पेस – अवकाश तंत्रज्ञानातील महत्त्वाची कंपनी, ईशित्व रोबोटिक्स सिस्टिम्स– एआय-आधारित कचरा व्यवस्थापन प्रणाली, डझी – ई-आयसीयूसाठी संपर्कविहीन रुग्ण निरीक्षण यंत्रणा, ख़ुशी बेबी- समुदाय आरोग्य देखरेखीसाठीचा ई-हेल्थ प्लॅटफॉर्म यांचा समावेश होता.

मॅरिको इनोव्हेशन फाऊंडेशन नाविन्यपूर्ण संशोधनांना सातत्याने पाठिंबा देत आहे आणि भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत दीर्घकालीन परिणाम असलेल्या उपाययोजनांना प्रोत्साहन देत आहे. इंडिया इनोव्हेशन आयकॉन्स २०२५चे विजेते नवसंकल्पनांच्या पुढील प्रवाहाला दिशा देतील आणि भारताच्या नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रातील भविष्यातील कल्पनांवर, बदलांवर प्रभाव टाकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments