*
पनवेल दि. 9:- पनवेल महानगरपालिकेच्यावतीनेजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महिलांचा सन्मान करण्यासाठी भव्य दिव्य नाविन्यपूर्ण अशा हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास पनवेलकर महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन महोत्सव साजरा केला.
या महोत्सवाची सुरूवात बचत गटाच्या स्टॉलच्या व आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाने करण्यात आली करण्यात आली. श्रीमती वर्षा प्रशांत ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे,माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त सर्वश्री भारत राठोड, कैलास गावडे, गायिका मिथिला माळी, उपायुक्त रविकिरण घोडके, स्नेहल पाटील- धमाणे इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या महोत्सवात बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी 25 बचत गटांचे स्टॉल् तीन दिवस म्हणजे 9 मार्च पर्यंत असणार आहेत. या स्टॉल्सवर कापडी पिशव्या,ज्वेलरी, कपडे, खाद्य पदार्थ, चप्पल बॅग, कपडे, क्लिनिंग प्रोडक्टस्, अगरबत्ती, पर्स, साड्या, सौंदर्य प्रसाधने असे विविध वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
या बचत गटाच्या स्टाॅल्सना दिवसभरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. सर्वच स्टाॅल्सना खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली.
*आरोग्य शिबीराचे आयोजन*
महापालिका कायमच आरोग्य बाबत सजग असते, महिलांच्या आरोग्याची काळजी घेत पनवेल महानगरपालिकेने विशेष अशा आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या बचत गटाच्या उद्घाटन नंतर मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य शिबीरामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची पॅप स्मिअर अशा विविध चाचण्या करण्यात आल्या.या बरोबरच रक्तातील विविध घटकांची तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी एमजीएम महाविद्यालयातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.
*स्वरक्षणाचे धडे*
महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धाच्या संचालिका, राष्ट्रीय पारितोषक विजेत्या तपस्वी गोंधळी आणि त्यांचे सहकारी प्रात्यक्षिक सादर केले.
*सायबर सुरक्षा आणि उपाय व्याख्यान*
तसेच आजकाल होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून आपला बचाव व्हावा याकरिता नवी मुंबई येथील सायबर सेलचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांचे सायबर सुरक्षेवर त व्याख्यान झाले.यावेळी त्यांनी सायबर फ्राॅड आणि त्यापासून बचाव करताना विविध प्रकारचे ऑनलाईन फ्राॅड, डिजिटल अरेस्ट, व्हाट्स अप फ्राॅड अशा विविध फसवणूक बाबत मार्गदर्शन केले. अतिशय साध्या सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी सायबर च्या गुन्ह्या विषयी माहिती दिली. तसेच या फ्रॉड पासून आपण स्वतः कसे वाचवावे याबाबतही मार्गदर्शन केले
*निरोगी आरोग्यासाठी टिप्स*
यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी महत्वपूर्ण अशा टिप्स दिल्या. महिलांशी थेट संवाद साधत त्यांनी या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विशेष रंगत आणली.
तसेच मेघना संजय कदम यांच्या प्राणिक हिलरव्दारे आपले मन आणि शरीर स्वस्थ ठेवण्याबाबत महिलांशी चर्चा करून सोप्या सोप्या टिप्स दिल्या. गायिका मिथिला माळी यांनीही एक सुंदर गीत सादर केले. *तसेच यावेळी बेटी बचाव बाबत सर्वांनी शपथ देखील घेतली.*
*खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभेच्छा*
दुपारच्या सत्रात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महोत्सवास सदिच्छा भेट देत महिला भगिनीची संवाद साधला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी आयुक्त मंगेश चितळे व महापालिका सर्व अधिकारी, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपजिल्हा प्रमुख मंगेश रानावडे उपस्थित होते.
*खेळ पैठणीचा- आवाज पनवेलचा*
या नंतर खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा लोकप्रिय कार्यक्रम हरीश मोकल यांनी सादर केला. या कार्यक्रमात महिलांचा उत्साह ओसंडून वाहिला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नाट्यगृह तुडुंब भरले. विजेत्या चार महिलांना पैठणीची विशेष भेट देण्यात आली.
तसेच महिलांसाठी गीत, संगीत, गायन, नृत्य, ‘महाराष्ट्राची लोक संस्कृती’ असा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला . या कार्यक्रमात उपस्थित महिलांनाही सहभागी होऊन गाण्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी विविध नृत्य व गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, परंपरेचे दर्शन घडविले.
*सांगता समारंभ*
हिरकणी महोत्सव सांगता समारंभास आमदार प्रशांत विशेष भेट देऊन महिला भगिनींशी संवाद साधला.येत्या दोन महिन्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर पनवेल शहाराचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत महापालिकेला जोमाने काम करावे लागणार आहे. या कामात सर्वांचे योगदान पाहिजे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.तर आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिकेच्यावतीने हिरकणी महोत्सवात महिलांच्या उद्योग- व्यवसायाला चालना मिळावी, त्यांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असे सांगितले. या उत्स्फूर्त व भरपूर प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व महिलांचे आभार मानून, यापुढेही महापालिका महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी महापौर डॉ. कविता चौतमोल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आल्या. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महापालिकेच्या अग्निशमन दलातील शुभांगी घुले व तेजश्री सांळुखे यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री भारत राठोड, कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर , मंगला माळवे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे , डॉ. रूपाली माने ,श्रीराम पवार , सुबोध ठाणेकर, वैद्यकीय अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, महापालिका अधिकारी उपस्थित होते.सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
महोत्सवाच्या शेवटी आभार सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहॊकर यांनी केले.
…………..


