पुणे,12 मार्च 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांच्या टीमने स्वादुपिंडामध्ये गाठ असलेल्या येमेन येथील 72 वर्षीय महिला रूग्णावर यशस्वीरित्या रोबोटिक रॅडिकल डिस्टल पॅनक्रिऍटिको स्प्लेनेक्टोमी प्रक्रिया केली. भारतीय बनावटीच्या आधुनिक सर्जिकल रोबोटच्या माध्यमातून अशा प्रकारची केलेली ही महाराष्ट्रातील पहिली आणि भारतातील दुसरी प्रक्रिया आहे.
याबाबत माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ.ललित बन्सवल म्हणाले की,येमेन येथील या 72 वर्षीय महिला जेव्हा आमच्या रूग्णालयात आल्या होत्या,तेव्हा त्यांना पोटात तीव्र वेदना होत होत्या. येमेन मध्ये त्यांनी सोनोग्राफी केली होती आणि स्वादुपिंडामध्ये गाठ असल्याचे निदान झाले होते. त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेईस्तोवर गाठीचा आकार १०x६ सेमी एवढा मोठा झाला होता.
ते पुढे म्हणाले की,पेटस्कॅन द्वारे ही गाठ स्वादुपिंडामध्ये मर्यादित होती आणि त्यामुळे शस्त्रक्रिया शक्य होती याचे निदान झाले.त्यांच्या वयाच्या बाबीशिवाय त्यांचे वजन हे 140 किलो होते आणि बीएमआय हा 38 होता. त्याशिवाय त्यांना अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहासारख्या अनेक सहव्याधी होत्या. काही वेळा खुली शस्त्रक्रिया हा पर्याय असतो,मात्र रूग्णामधील गुंतागुंत लक्षात घेता आम्ही लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक शस्त्रक्रियेसारख्या कमीत कमी छेद असणाऱ्या प्रक्रियेचा सल्ला दिला.
त्यांना असलेल्या सहव्याधी,वजन आणि ट्युमरचे ठिकाण यामुळे ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती.या शस्त्रक्रियेला साधारण तीन तास लागले. स्वादुपिंडाच्या आजूबाजूला असलेल्या मुख्य रक्तवाहिन्यांना शस्त्रक्रियेदरम्यान बाजूला करणे गरजेचे होते. पॅनक्रिऍटिको स्प्लेनेक्टोमी ज्याला डिस्टल पॅनक्रिऍटेक्टोमी विथ स्प्लेनेक्टोमी असे म्हणतात.या प्रक्रियेमध्ये स्वादुपिंडाचा मुख्य भाग आणि अरुंद टोक (टेल) आणि कधीकधी स्प्लिहा काढण्याची शस्त्रक्रिया असते. ही प्रक्रिया स्वादुपिंडामध्ये ट्युमर/कर्करोग,क्रॉनिक पॅनक्रिऍटिटिस आणि इतर परिस्थितीमध्ये केली जाते.याबाबत स्प्लिहाला जाणाऱ्या वाहिनीचे गाठीने नुकसान झाल्यामुळे काढून टाकावी लागली.ही प्रक्रिया अतिशय अचूकतेने करणे गरजेचे होते आणि अशी प्रक्रिया करणारे मोजकेच तज्ञ आहेत.
डॉ.ललित बन्सवल पुढे म्हणाले की, रोबोटिक प्रणालीमुळे ही प्रक्रिया अचूकतेने करता आली.कमी रक्तस्त्राव आणि बाधित जागेच्या आजूबाजूला असलेल्या पेशींना कमीत कमी नुकसानामुळे रूग्णाला लवकर बरे होता येते.या रूग्णाला दोन दिवसातच आयसीयूमधून सामान्य रूम मध्ये आणण्यात आले आणि चालण्यास सांगितले गेले. ते म्हणाले की हिस्टोपॅथॉलाजी रिपोर्ट मध्ये ही गाठ कर्करोगाची नसल्याचे निदान झाले ( बिनाईन ट्युमर ) त्यामुळे इतर कुठलीही सहाय्यक उपचाराची गरज भासली नाही.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,मेड इन इंडिया रोबोट प्रणाली प्रस्थापित करण्याच्या काही आठवड्यातच केलेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आमच्या डॉक्टरांच्या टीमचे कौशल्य आणि नियमितपणे गुंतागुंतीच्या स्थिती हाताळण्याची क्षमता दर्शविते. रूग्णांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या आमच्या उद्दिष्टांचा हा एक भाग आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,हे यश आधुनिक तंत्रज्ञान आणि शल्य चिकित्सकांच्या कौशल्याच्या एकत्रीकरणामुळे दिसणाऱ्या चांगले परिणाम दर्शविते.


