Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवनेरीवर तिथीनुसार (दि.१७) शिवनेरी स्मारक समितीतर्फे होणार शिवजयंती उत्सव राजमाता जिजाऊ...

शिवनेरीवर तिथीनुसार (दि.१७) शिवनेरी स्मारक समितीतर्फे होणार शिवजयंती उत्सव राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा ; सवाद्य छबिना मिरवणुकीचे आयोजन

पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणेचे वतीने किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला सोमवार, दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शिवजागर धार्मिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४६ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

 

कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. यावेळी हिंदूधर्मवीर नितेश राणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. श्रीजगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.

 

सोमवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर शिवाई मातेस सौ. व श्री. विद्यावाचस्पती डॉ.नंदकिशोर एकबोटे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा होईल. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री मंत्री नितेश राणे, विद्यावाचस्पती डॉ. नंदकिशोर एकबोटे, शिवव्याखाते सौरभ कर्डे यांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होणार आहे. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९ ते १० यावेळेत शिवजन्मोत्सव साजरा करतील.

 

यावेळी पंचक्रोशीत विशेष काम करणा-या महिलेला राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओतूरच्या डॉ. रश्मी घोलप, कळंबच्या ह.भ.प.सुरेखा शिंदे, गोद्रेच्या सरपंच अनिता रेंगडे, पाडळीच्या सरपंच स्वाती कबाडी, सामाजिक कार्यकर्त्या राणी बो-हाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

 

सोहळ्यासोबतच ध्वजारोहण होऊन धर्मसभा होईल. यात शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे वतीने पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. पोवाडे गायन कार्यक्रमानंतर जाहीर अभिवादन सभा होईल. त्यामध्ये सौरभ कर्डे यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ६ वाजता जुन्नर शहरातून मिरवणूक व रात्री सांगता सभा होणार आहे. समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, चिटणीस रमेश कर्पे व शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments