* मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी व्हर्च्युअल रिॲलिटी या तंत्रज्ञानाचा वापर करून शल्यचिकित्सकांना प्रशिक्षित करणारी पश्चिम भारतातील अशा प्रकारची पहिली कार्यशाळा
पुणे,13 मार्च 2025 : पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटल या आघाडीच्या नेत्रचिकित्सा संस्थेतर्फे नुकतेच नेत्रतज्ञांसाठी अभिनव शल्यचिकित्सा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.ऑल इंडिया ऑप्थॉल्मोलॉजी सोसायटीचे समर्थन प्राप्त असलेल्या या कार्यशाळेत पुढील टप्प्यातील मोतीबिंदू आणि निगडीत शस्त्रक्रियांमध्ये तरुण नेत्ररोग शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रभरातून सुमारे 35 नेत्ररोग चिकित्सकांनी भाग घेतला.
पुढील पिढीतील शल्यचिकित्सक निर्माण करण्यासाठी वेटलॅबमधील प्रत्यक्ष शिक्षणावर भर देणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत आवश्यक आहेत,असे मत एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे व वैद्यकीय संचालक डॉ.कुलदीप डोळे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे वैशिष्टय म्हणजे ओक्युलस हे अत्याधुनिक व्हीआर मॉडेल (आभासी वास्तविकता प्रारूप) याचा वापर करण्यात आला.यामुळे डॉक्टरांना स्वतंत्रपणे शस्त्रक्रियेच्या विविध टप्प्यांचा सराव करता आला. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान समाविष्ट असलेली ही अशा प्रकारची पश्चिम भारतातील पहिली कार्यशाळा असून शल्यचिकित्सकांना प्रशिक्षित करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन आणेल,असा विश्वास एच व्ही देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ.सुचेता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा प्रशिक्षणासाठी वेट लॅब सारख्या सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध आहे,असे नेत्रतज्ञ डॉ.आश्विनी गायकवाड यांनी सांगितले.
एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ.परवेझ बिलिमोरिया म्हणाले की,नेत्र चिकित्सकांना अद्ययावत कौशल्य आणि तंत्रज्ञानाने प्रशिक्षित करणे हे सर्वसामान्यांना जागतिक दर्जाची नेत्र चिकित्सा सेवा प्रदान करण्याची एच व्ही देसाई आय हॉस्पिटलची कटिबद्धता दर्शविते.


