पुणे, २७ मार्च २०२५: MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) च्या HackMIT-WPU 2025 अंतर्गत आयोजित ‘Make in MIT-WPU Pavilion मध्ये विद्यार्थ्यांच्या एअरोस्पेस, रोबोटिक्स, ऑटोमोटिव्ह आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी क्लबच्या नेतृत्वाखालील भव्य रोडशोने झाली, त्यानंतर पॅव्हिलियनचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुनील, अतिरिक्त महासंचालक, प्रसार भारती, भारत सरकार, नवी दिल्ली; श्री. शाम अर्जुनवडकर, फाउंड्री व ऊर्जा संवर्धन तज्ज्ञ, पुणे; आणि श्री. योगेश जोशी, ग्लोबल MDM प्रॅक्टिस हेड, विप्रो टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी उपस्थिती लावली. मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या नवकल्पनांची माहिती घेतली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रो. डॉ. विश्वनाथ डी कराड. यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प सादर केले. केम-ई-कार या प्रकल्पात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक नियंत्रणाशिवाय केवळ रासायनिक ऊर्जेच्या मदतीने चालणाऱ्या वाहनाचे प्रदर्शन करण्यात आले. स्पेस टेक्नॉलॉजी रिसर्च ग्रुप (STeRG) ने एअरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटकांचे अत्याधुनिक संशोधन सादर केले. टीम फिनिक्स ने स्वायत्त ड्रोन तंत्रज्ञानासह रेसिंग आणि कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ड्रोन प्रकल्प सादर केला.
याशिवाय, स्कायट्रूपर्स यांनी अत्याधुनिक विमान मॉडेल सादर केले, जे एअरोमॉडेलिंग स्पर्धांसाठी विकसित करण्यात आले होते. टीम ड्रिफ्टर्स ने ‘प्रिमस’ या फॉर्म्युला 1-प्रेरित कॉम्बशन वाहनाचे अनावरण केले, तर अॅक्सेलरेसर्स इलेक्ट्रिक यांनी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानातील त्यांची प्रगती प्रदर्शित केली.
कार्यक्रमात बोलताना, श्री. सुनील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि नवकल्पनांचे कौतुक केले. त्यांनी MAKE IN MIT-WPU पॅव्हिलियन हे भारताच्या वाढत्या इनोवेशन इको सिस्टीम चे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. तसेच, तांत्रिक कौशल्यांबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील वापरावर भर देणाऱ्या विद्यापीठाच्या दृष्टिकोनामुळे हे तरुण इनोव्हेटर्स भविष्यात संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. शाम अर्जुनवडकर यांनी पॅव्हिलियनमध्ये सादर केलेले प्रकल्प विविध क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात, असे नमूद केले. एअरोस्पेस, सस्टेनेबिलिटी आणि ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवीन तांत्रिक संकल्पनांमुळे तंत्रज्ञानाच्या सीमा अधिक विस्तारल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मिलिंद पांडे, MIT-WPU चे प्र कुलगुरू आणि हॅकMIT-WPU चे प्रमुख संयोजक यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ‘माइंड टू मार्केट’ आणि ‘पेपर टू प्रॉडक्ट’ ही संकल्पना रुजवण्याचा आहे. नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतांना धार देऊन, आपण नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक घडवू इच्छितो. हा उपक्रम आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया मिशनला थेट पाठिंबा देतो.
==============================


