गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेर्गत दि. २७ मार्च २०२५ रोजी राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६,५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व मा.ना. पंकजाताई मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत देशी गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. शेखर मुंदडा यांनी दिली.
सद्यस्थितीत देशी गायींची उत्पादनक्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. तसेच भाकड / अनुत्पादक गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर ठरत नसल्याने अशी जनावरे गोशाळेत ठेवण्यात येतात. त्यामुळे गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सन २०२४–२५ महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या गायींना रु. ५०/- प्रती दिन प्रती देशी गोवंश अनुदान देण्यासाठी शासनाने गोवंश परिपोषण योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यातील हजारो गोशाळांना आधारभूत ठरली असून, आतापर्यंत ५६० गोशाळांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आल्याचे आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. शेखर मुंदडा यांनी सांगितले.
ना. पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरात गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरु असलेले काम प्रशंसापात्र असून, देशी गोवंश संरक्षण व संवर्धनाचा प्रश्न गोसेवा आयोगाच्या प्रभावी कामकाजामुळे निकाली निघत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या कार्यासाठी अविरत प्रयत्न करणारे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. शेखरजी मुंदडा, आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सनतकुमार गुप्ता,
मनीष वर्मा, परेश शाह, दीपक भगत, सदस्य सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक व सर्व अधिकारी- कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.
देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून, देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अधिकाधीक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी सतत कार्यमग्न असल्याची माहिती मा. श्री. शेखर मुंदडा यांनी दिली.
असे आहे योजनेचे स्वरुप
महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळांतील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रती दिन अनुदान देय राहिल.
अनुदानाची रक्कम: रुपये ५०/- प्रती दिन प्रती देशी गाय
अनुदान पात्रतेच्या अटी :
महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र राहतील.
संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
गोशाळेत किमान ५० गोवंश असणे आवश्यक राहिल.
संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगींग करणे अनिवार्य राहिल.
ईअर टॅगिंग असलेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र राहिल.
संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे
आवश्यक आहे.


