मधुमेहाचे यशस्वी व्यवस्थापन हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नसून, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची रुग्णाप्रती असलेली संवेदनशीलता व आपुलकी यावरच खऱ्या अर्थाने अवलंबून असते.-डॉ.चित्तरंजन याज्ञिक
पुणे, १६ नोव्हेंबर २०२६: जागतिक मधुमेह दिनानिमित्त केईएम रुग्णालयाच्या डायबेटिस युनिट तर्फे बालमधुमेही मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध सांस्कृतिक आणि गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांसाठीच्या ‘मधुसंवाद’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया, जगप्रसिध्द संशोधक व केईएम हॉस्पिटल पुणे येथील डायबेटिस युनिटचे प्रमुख डॉ.चित्तरंजन याज्ञिक,डायबेटॉलॉजी आणि स्लिप मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता धाडगे, बालरोगतज्ञ व पेडीयाट्रिक डायबेटीस विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना जोग आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बालमधुमेही मुलांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा आविष्कार सादर केला. त्यानंतर ‘मधुसंवाद’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
बालमधुमेही मुले, त्यांचे पालक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. मधुमेहाचे व्यवस्थापन ही केवळ वैद्यकीय उपचारांची बाब नसून मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या की, टाईप १ मधुमेहींच्या आयुष्यातील प्रवासामध्ये आई-वडिलांची भूमिका तितकीच महत्वाची असते रुग्णालय व येथील डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास यासाठी सर्व पालकांचे त्यांनी आभार मानले
डॉ.चित्तरंजन याज्ञिक म्हणाले की, पुण्यातील या प्रख्यात मधुमेह विभागाची स्थापना याच सभागृहात एका लहान रोपासारखी झाली होती, विशेष म्हणजे यासाठी बानू कोयाजींचे वरदान लाभले होते. त्या काळी भारतीय लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण नगण्य असल्याचा सर्वसाधारण समज होता, परंतु मी विद्यार्थी असल्यापासूनच समाजात आणि विशेषतः तरुण पिढीत मधुमेह मोठ्या प्रमाणावर असल्याचे सातत्याने दिसत होते. हाच महत्त्वाचा अभ्यास करण्यासाठी मिळालेल्या त्या पहिल्या ग्रांटचे उद्घाटन याच ठिकाणी पार पडले होते. १९८७ मध्ये ‘भारतीय लोकांमध्ये डायबिटीसचा अभ्यास’ करण्यासाठी पहिली संशोधन ग्रांट इंग्लंडमधून या संस्थेला मिळाली होती. आज हा विभाग ४०व्या वर्षात पदार्पण करत आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून, ते डॉक्टर आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते, याच तत्त्वावर केईएम हॉस्पिटल मधील हा विभाग वाटचाल करत असून या क्षेत्रात आपले अग्रेसर स्थान टिकवून आहे.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ. स्मिता धाडगे म्हणाल्या की उपचारपलिकडे जाऊन मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. मधुमेहींना आपले अनुभव आणि विचार मांडण्यासाठी या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बालरोगतज्ञ व पेडीयाट्रिक डायबेटीस विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना जोग म्हणाल्या की, आपल्याला मधुमेह आहे म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये अपूर्णता आहे हे मनातून काढून टाका . कारण ह्याच गोष्टी आपल्या आयुष्यात प्रेरक शक्ती बनतात, आपल्यापैकी अनेक जणांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीतून हेच दिसून येते.
केईएम रुग्णालयाचा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक मुलाला स्वप्नांनी, आशांनी आणि आनंदाने भरलेले सुंदर बालपण जगण्याचा अधिकार आहे. हा उपक्रम म्हणजे मुलांना आणि त्यांच्या पालकांना या प्रवासात ते कधीही एकटे नाहीत, याची जाणीव करून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. मुलांचे धैर्य आम्हाला प्रेरणा देते, त्यांचे हास्य आम्हाला प्रोत्साहन देते आणि त्यांची स्वप्ने आम्हाला संवेदनशील व आरोग्यसेवेचे महत्त्व पटवून देतात. मधुमेह हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग असू शकतो; मात्र त्यामुळे त्यांची स्वप्न साकार करतांना मार्गात कोणताही अडथळा निर्माण हो
ता कामा नये.


