पुणे ः समर्थ रामदासांनी विविध ठिकाणी हनुमान मंदिरे उभारून बलोपासनेचे शिक्षण दिले. त्यांनी तरुण पिढीसमोर प्रभू श्रीराम आणि हनुमंताचा आदर्श ठेवून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली. समाजाच्या नैतिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी त्यांनी भक्तिमार्गाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केले, असे मत ज्येष्ठ व्याख्याते दिलीप महाजन यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३५ व्या पुण्यतिथी उत्सवात दिलीप महाजन यांचे “समर्थ रामदासांचे राष्ट्रकारण” या विषयावर व्याख्यान झाले.
दिलीप महाजन म्हणाले, समर्थ रामदासांनी आपल्या संप्रदायात चतुःसूत्रीची संकल्पना मांडली, ज्यामध्ये समाजकारण आणि राजकारण यांचाही समावेश होता. त्यांच्या राजकारणाचा गाभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी पाठबळ देण्याचा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला पूरक असा समाज उभा करून हिंदवी स्वराज्य निर्मितीला हातभार लावणे हेच त्यांचे राष्ट्रकारण होते. समाजाची गरज ओळखून त्यांनी या कार्याची सुरुवात केली आणि त्यांच्या राजकारणाचे मूळ हेच राष्ट्रकारण होते. असेही सांगितले.


