२०२१ सालातील वचनाची पूर्तता; ज्या देशांमध्ये कायदेशीर आदेश नाही, त्या देशांमध्येही मेदयुक्त पदार्थ व तेलांमधून आयटीएफए काढून टाकली
मिनेपोलिस (फेब्रुवारी २, २०२४) — जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या कारगिल अन्नपदार्थांच्या ग्राहकाला १ जानेवारी, २०२४पासून एका गोष्टीबाबत आत्मविश्वास नक्कीच असेल. ती गोष्ट म्हणजे कंपनीच्या मेदयुक्त पदार्थांमध्ये (फॅट्स) आणि तेलांमध्ये, औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स-फॅटी आम्लांचे (आयटीएफए) प्रमाण, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केलेल्या कमाल मर्यादेहून कमीच असेल. आयटीएफएबाबत डब्ल्यूएचओने निश्चित केलेल्या सर्वोत्तम पद्धत मानकाची पूर्तता कंपनीच्या संपूर्ण जगभरातील खाद्यतेल श्रेणी करत आहेत. हा पल्ला गाठणारी कारगिल ही पहिली जागतिक पुरवठादार कंपनी ठरली आहे. दर १०० ग्रॅम मेदयुक्त पदार्थ किंवा तेलामध्ये आयटीएफएचे प्रमाण दोन ग्रॅम्सहून अधिक नसावे, अशी शिफारस डब्ल्यूएचओने केली आहे. ज्या देशांमध्ये ह्याबाबत कोणतेही कायदेशीर बंधन सध्या नाही, त्या देशांतही कारगिलद्वारे पुरवले जाणारे खाद्यतेल/मेदयुक्त पदार्थ ह्या मानकाचे पालन करणारेच आहेत.
आपल्या सर्व मेदयुक्त पदार्थ व तेलांच्या श्रेणींमधून आयटीएफए काढून टाकण्याचा वायदा कारगिलने डिसेंबर २०२१ मध्ये केला असला, तरी हे साध्य करण्यामागे अनेक दशकांचे काम आहे. कंपनीचा आयटीएफए काढून टाकण्याचा प्रवास गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहे. ह्यांमध्ये सुरुवातीचे नवोन्मेष, भांडवल खर्च व संसाधनांमध्ये केलेली लक्षावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि संशोधन व विकासात घालवलेल्या हजारो तासांचा समावेश होतो. ह्या मार्गाद्वारे कारगिलने ४००हून अधिक ग्राहक कंपन्यांना पोषक व चविष्ट उत्पादने तयार करण्यात मदत केली आहे. ही उत्पादने आयुष्य अधिक आनंदी व निरोगी करण्यात योगदान देतात. आयटीएफएचा समावेश असलेली दीड अब्ज पाउंड्स वजनाची उत्पादने जागतिक अन्न पुरवठ्यातून काढून टाकण्यात कंपनीने यश मिळवले आहे.
“आपल्या सर्व तेलांमधून औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅट्स काढून टाकण्याप्रती कारगिल दाखवत असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी बघून आम्हाला आनंद झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मानकांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट कारगिलीने अलीकडेच साध्य केले आहे,” असे पेप्सीकोचे प्रमुख वैज्ञानिक अधिकारी रेने लॅमर्स सांगतात. “ह्याच मानकांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने, आपल्या अन्नपदार्थांतून आयटीएफए यशस्वीरित्या काढून टाकण्याच्या, पेप्सीकोच्या कृतीशी हे मिळतेजुळते आहे. उद्योगक्षेत्रातील आमच्या अन्य सहयोगींनीही ह्या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपले अन्नपदार्थ व पेये पर्यावरणासाठी तसेच ग्राहकांसाठी अधिक चांगली व्हावीत ह्या दृष्टीने विकसित करावी ह्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो.”
तेलावरील प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॅटचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कारखाने अद्ययावत करण्यासाठी, कारगिलने, केवळ गेल्या दोन वर्षांत, ८५ लाख डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर १२ देशांतील १०० अतिरिक्त ग्राहकांशी सल्लामसलत करून त्यांच्या आवश्यकता पूर्ण करणारी नवीन उत्पादने नव्याने विकसित करण्यावरही काम केले जात आहे.
आयटीएफए सहसा अंशत: वनस्पतीजन्य तेलांच्या आंशिक हायड्रोजनेशनच्या (पीएचओ) माध्यमातून तयार होतात पण ती खाद्यतेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेतील उच्च औष्णिक उपचारांतूनही तयार केली जाऊ शकतात. २०२३ सालापर्यंत जगभरातून आयटीएफएंचे निर्मूलन करण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने २०१८ मध्ये केले होते. आपल्या एकूण ऊर्जाग्रहणामध्ये ट्रान्सफॅट्सचा समावेश एक टक्क्याहून अधिक असेल, तर त्यामुळे कोरोनरी हृदयविकाराच्या समस्या निर्माम होतात आणि ते प्राणघातकही ठरू शकते ह्यांची नोंद घेत डब्ल्यूएचओने ते आवाहन केले होते.
“हे वचन पूर्ण केल्याचा तसेच सुरक्षित, जबाबदार व शाश्वत मार्गाने जगाची जोपासना करण्याचे आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने हातभार लावल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो,” असे कारगिलच्या खाद्यतेल विभागाच्या उपाध्यक्ष तसेच उत्तर अमेरिका विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक नताशा ओर्लोव्हा म्हणाल्या. “ज्या देशांमध्ये आयटीएफएबद्दल काहीच नियम नाहीत, त्या देशांतही आपणहून आयटीएफएचे मानक पूर्ण करणारी उत्पादने पुरवण्याचे उद्योगक्षेत्रात अग्रेसर ठरेल असे पाऊल कंपनीने उचलले आहे. त्यामुळे मोठ्या अन्न उत्पादक कंपन्यांसाठीच्या पुरवठा साखळीत सातत्य राखण्यात मदत होईल आणि त्याचबरोबर कारगिलच्याविस्तृत नवोन्मेष व अनुभवाचा लाभ छोट्या उत्पादकांनाही देऊ करणे शक्य होईल.”
मानकांची पूर्तता करण्यासाठी कारगिलने आपल्या व्यापक अन्न सुरक्षितता व दर्जा हमी कार्यक्रमात आयटीएफए मुद्दयाचा समावेश केला आहे. ह्या व्यवस्थेवर आधारित दृष्टिकोनामध्ये देखरेख, पूर्तता व परीक्षणाच्या अनेक स्तरांचा अंतर्भाव आहे.
आयटीएफएच्या वापरावर मर्यादा आणणारी धोरणे जगातील केवळ ६० देशांमध्ये अंमलात आणली जात असून, त्यामुळे जगातील सुमारे ४३ टक्के लोकसंख्येलाच ह्या धोरणांचा लाभ मिळत आहे असे डब्ल्यूएचओने आपल्या नवीन प्रगती अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे जगातील बहुसंख्य लोकांना आयटीएफएच्या वापराचा धोका कायम आहे. ‘जगभरातील अन्नपदार्थ उत्पादक कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या तेल व मेदयुक्त पदार्थांतील औद्योगिकरित्या उत्पादित टीएफएचे प्रमाण मर्यादेत राखण्यासाठी कारगिलने केलेल्या प्रयत्नांचे1’ अनुकरण तेल व मेदयुक्त पदार्थांच्या सर्व प्रमुख पुरवठादारांनी करावे, असे आवाहन ह्या अहवालात करण्यात आले आहे.
“डब्ल्यूएचओ मानकांच्या पूर्ततेची ग्वाही देणारी आणि सातत्याने तिचे पालन करणारी तसेच आमच्या संपूर्ण जागतिक पोर्टफोलिओमध्ये ह्या मानकांची पूर्तता करणारी आम्ही पहिली व एकमेव जागतिक खाद्यतेल पुरवठादार कंपनी आहोत. आम्हाला आम्ही गाठलेल्या टप्प्याबद्दल सार्थ अभिमान असला, तरी अद्याप बरेच काम करणे आवश्यक आहे हे डब्ल्यूएचओच्या अहवालातून स्पष्ट होते,” असे ओर्लोव्हा ह्यांनी सांगितले. “सॅच्युरेटेड फॅट्सच्या स्तरांबाबत जागरूक राहून आयटीएफएबाबतच्या शिफारशींची पूर्तता करणे व्यवहार्य आहे हे तर आम्ही सिद्ध केलेच आहे. शिवाय, ह्यामुळे ग्राहकांच्या आवडत्या अन्नपदार्थांची चव किंवा पोत बदलत नाही हेही आम्ही दाखवून दिले आहे. उद्योगक्षेत्रातील अन्य कंपन्यांनीही आमच्या मार्गावरून चालावे आणि त्यांच्या सर्व उत्पादनांतून आयटीएफए काढून टाकावीत असे आवाहन आम्ही करतो.”
कारगिल गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण उद्योगक्षेत्रातील प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करत आहे, विशेषत: कंपनीने ह्याबाबत ग्वाही दिली, त्यावेळी ज्या देशांमध्ये आयटीएफएसंदर्भात कोणतेही नियम नव्हते, त्या देशांत प्रक्रिया सुधारणेसाठी कंपनी मदत करत आहे. ह्या कृतीचा भाग म्हणून पाकिस्तानात कारगिलने सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूटसोबत जनजागृती अभियान राबवण्यासाठी सहयोग केला. मलेशिया व मेक्सिकोमध्ये कंपनीने उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील व सरकारमधील संबंधित ह्यांच्याशी, डब्ल्यूएचओच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत, संवाद साधला. त्याचप्रमाणे आयटीएफए काढून टाकण्याबाबतच्या अनुभवाबद्दल व कौशल्याबद्दल त्यांना सांगितले.
भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ह्यांनी उत्पादनांतील ट्रान्सफॅट्सबाबत घालून दिलेल्या काटेकोर नियमांची पूर्तता करण्यासाठी कारगिल जानेवारी २०२२ पासून परिश्रमपूर्वक काम करत आहे. कारगिलने आपली बांधिलकी दाखवून देत, भारतभरात तेले व मेदयुक्त पदार्थांच्या श्रेणींच्या सुधारणेसाठी लक्षणीय पावले उचलली आहेत. कंपनीने आपल्या कांडला तेल शुद्धीकरण कारखान्यात अत्याधुनिक इंटरेस्टेरिफिकेशन (आयई) तंत्रज्ञान आणण्यासाठी २०२१ मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून कंपनीचे समर्पण अधोरेखित होते. त्यामुळे मेदाची कार्यात्मकता (फॅट फंक्शनॅलिटी) सुधारून डब्ल्यूएओच्या ट्रान्स-फॅट कमी करण्याच्या नियमांचे पालन शक्य होत आहे. शिवाय, कठोर उत्पादन प्रक्रिया विकासाच्या माध्यमातून कारगिलच्या पीपीडी टीमने, लोकप्रिय चवी, पोत तसेच उत्पादनांची टिकण्याची क्षमता ह्यांच्याशी तडजोड न करता, ट्रान्स-फॅट्सची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करण्याची तंत्रे, यशस्वीरित्या विकसित केली आहेत. ही नवोन्मेषकारी तंत्रे सर्व उत्पादन श्रेणींमध्ये उपयोगात आणली जात आहेत. कारगिलने सुयोग्य कार्यात्मकता तसेच ग्राहकांचे समाधान ह्यांना धक्का न लागू देता उद्योगक्षेत्राच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी असंख्य उपाय विकसित केले आहेत.


