अलीकडेच न्यूट्रिशन आणि वेलनेस सल्लागार शीला कृष्णस्वामी यांनी बदामांच्या आरोग्यविषयक फायद्यांवर आधारित एक शैक्षणिक सत्र घेतले. या सत्रात त्यांनी Almond Board of California च्या सहाय्याने झालेल्या तीन महत्त्वाच्या अभ्यासांचा आढावा घेतला, जे डॉ. मार्क केर्न, डॉ. ऑलिव्हर सी. विटार्ड आणि डॉ. अनुप मिश्रा यांनी केले होते. या अभ्यासांतून पूर्व-मधुमेह नियंत्रण आणि स्नायूंच्या पुनर्बलनात बदामांचे महत्त्व अधोरेखित झाले.
कृष्णस्वामी यांनी सांगितले की, रोज बदाम खाल्ल्याने पूर्व-मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेवर सकारात्मक परिणाम होतो. त्यांनी डॉ. केर्न यांच्या संशोधनाचा उल्लेख केला, ज्यात आठ आठवडे दररोज दोन औंस (सुमारे 56 ग्रॅम) बदाम खाल्ल्याने व्यायामानंतरची स्नायूंची वेदना कमी होते, स्नायूंची ताकद वाढते आणि स्नायूंना होणारे नुकसान कमी होते, असे दिसून आले.
डॉ. विटार्ड यांच्या Frontiers in Nutrition या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातही असाच निष्कर्ष आढळून आला की, आठ आठवडे बदाम खाल्ल्याने मध्यम वयाच्या लोकांमध्ये स्नायूंचा जखम होण्याचा त्रास कमी होतो आणि स्नायूंचे कार्य सुधारते.
स्नायू पुनर्बलनाबाबत बोलताना कृष्णस्वामी म्हणाल्या, “प्रथिने आणि 15 महत्त्वाच्या पोषकतत्त्वांनी युक्त असलेले बदाम हे वर्कआउटनंतर किंवा आधी खाण्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. हे स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करतात आणि एकंदर आरोग्यास पोषक ठरतात.”
डॉ. अनुप मिश्रा यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, पूर्व-मधुमेह असलेल्या लोकांनी जेवणाच्या 30 मिनिटे आधी 20 ग्रॅम बदाम खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
या अभ्यासांवर प्रतिक्रिया देताना कृष्णस्वामी म्हणाल्या, “मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना, संतुलित आहारात बदामांचा समावेश केल्यास पूर्व-मधुमेह नियंत्रित करण्यात मदत होते. बदाम रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखतात आणि हृदयाचे आरोग्य तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.”
या सत्रामध्ये हे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले की, बदाम हे स्नायूंच्या पुनर्बलनापासून ते रक्तातील साखरेच्या नियंत्रणापर्यंत एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषकतत्त्वांनी समृद्ध असलेले बदाम कोणत्याही आहारात सहज समाविष्ट करता येतील असा पौष्टिक आणि व्यवहार्य पर्याय आहेत.


