Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभांडारकर संस्थेतील हस्तलिखिते पुन्हा एकदा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट* नाट्यशास्त्राच्या एका आणि...

भांडारकर संस्थेतील हस्तलिखिते पुन्हा एकदा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट* नाट्यशास्त्राच्या एका आणि भगवद्गीतेच्या पाच हस्तलिखितांचा समावेश

 

पुणे, दि. १८ – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील सहा हस्तलिखितांचा समावेश युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये झालेला आहे. दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचे एक हस्तलिखित तसेच भगवद्गीतेची काश्मीरी शारदा लिपीतील पाच हस्तलिखिते यांची विशेष नोंद युनेस्कोने नुकतीच घेतलेली आहे.

युनेस्कोच्या यादीतील समावेशाकरिता कागदपत्रांची पूर्तता नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील अभ्यासक डॉ. रमेशचंद्र गौर यांच्या चमूने तसेच भांडारकर संस्थेतील डॉ. अमृता नातू आणि डॉ. श्रीनन्द बापट यांनी गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये केली होती.

जॉर्ज ब्यूह्लर या विद्वानाने १८७५-७६ या वर्षात भगवद्गीतेची तीन हस्तलिखिते काश्मीरमधून मिळवलेली होती. तसेच सर रा. गो. भांडारकरांनी १८८३-८४ या वर्षात दिल्लीहून दोन हस्तलिखिते विकत घेतलेली होती. या सर्व हस्तलिखितांचा संस्कृत भाषेमधला मजकूर शारदा लिपीत लिहिलेला असून भगवद्गीतेवरील निरनिराळ्या प्राचीन टीका या पाच हस्तलिखितांमध्ये आढळतात. त्यामुळे हा वारसा जागतिक महत्त्वाचा असल्याचे युनेस्कोने घोषित केलेले आहे.

नाट्यशास्त्राचे हस्तलिखित जॉर्ज ब्यूह्लर या विद्वानानेच १८७३-७४ या वर्षी राजस्थानातून मिळवलेले होते. या हस्तलिखितामध्ये एकूण २६० पृष्ठे असून नाट्यशास्त्राच्या अत्यंत प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व ही पोथी करते. रूपणिमिश्र हे या पोथीचे लेखनिक होते असे दिसून येते.

ऋग्वेद, सहृदयालोकलोचन हा अभिनवगुप्ताचा काव्यशास्त्रावरील प्राचीन ग्रंथ तसेच पंचतंत्र या भांडारकर संस्थेतील तीन महत्त्वाच्या हस्तलिखितांचा समावेश यापूर्वीच युनेस्कोच्या या यादीत झालेला आहे.

——————

🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments