लातूर, दि.७ मे: ” भारत भूमीत अमुलाग्र बदल घडत असतांना रामेश्वर रूई या गावाचे नामांतर विश्वधर्मी मानवतातीर्थ म्हणून करण्यात आले आहे तो दुर्लभ योग आहे. या देशात ६ लाख गावे असून आता येथे ही मोठे बदल घडतील. यामुळेच भारत देश संपूर्ण जगात आदर्श राष्ट्र म्हणून उदयास येईल.” असे विचार जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या प्रेरणेने व पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या आशीर्वादाने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) नामकरण सोहळ्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई)’ नामकरण कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी विश्वशांंती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड होते. तसेच माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड व आमदार रमेश कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे व राजेश कराड हे उपस्थित होते.
त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,ज्येष्ठ कवी व लेखक डॉ.संजय उपाध्ये, गिरीश दाते उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,” देशातील प्रत्येक गावांत बदल घडत असतांना डॉ. कराड यांनी आदर्श गावाचे उदाहरण जगासमोर मांडले. या गावात सर्व जातीचे लोक एकत्रित राहतात. हा संदेश संपूर्ण विश्वात पोहचेल. खर्या अर्थाने हे गांव मानवतातीर्थ म्हणून उदयास आले आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” देशाला जाती धर्माचा शाप लागला आहे. अशा वेळेस वारकरी संप्रदाय हा मानवतेचा संदेश देणारा धर्म आहे. त्याग आणि समर्पणामुळे या गावाची ओळख ज्ञान यज्ञ भूमी म्हणून झाली आहे. वर्तमान काळात जगाची अवस्था ही अत्यंत वाईट होत चालली आहे. अशा वेळेस सर्वांना शांतीची आवश्यकता आहे. ज्या वेळेस घराचा कर्ता बिघडतो त्या वेळेस घर बिघडते. तसेच देशाच्या कर्त्याला अहंकार आला तर देशाची स्थिती बदलू शकते. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.”
आमदार रमेश कराड म्हणाले,” या गावाचे भाग्य असून सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा दिवस आहे. डॉ. कराड यांच्या कार्यामुळे या गावाची ओळख संपूर्ण जगात झाली आहे. डॉ. कराड यांनी ज्ञानाचे मंदिर उभे करून पुढची पिढी घडविली आहे. वारकरी संप्रदायामुळे एकता वाढते आहे आणि त्यासाठीच आपण कार्य करीत आहात. गावातील नागरिकांनी संकल्प घ्यावा की कोणताही भेद भाव करणार नाही. डॉ. कराड यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन समर्पित केले.”
प्रा.डॉ. मंगेश तु.कराड म्हणाले,”आजच्या या ऐतिहासिक दिवसावर हे गाव विश्वधर्मी आणि विश्वशांतीसाठी कार्य करीत आहे. डॉ. विश्वनाथ दा कराड यांनी आपल्या नावाला अनुसरूनच विश्व कार्य सुरू आहे. त्यांनी आपले जीवन विश्वशांतीसाठी अर्पीत केले आहे. यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठ्या विश्वशांतीच्या डोमची निर्मिती केली आहे.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” रामेश्वर गावाची नोंद महाराष्ट्राने घेऊन या संदर्भात जीआर काढावा. या गावातील हिंदू मुस्लिमांनी आर्थिक योगदान देऊन सर्व धर्मांचे स्थळ उभे केले आले. वर्तमान काळातील स्थिती पाहता आपल्याला युद्धाकडून बुद्धाकडे जावयाचे आहे.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले,”शिक्षण हे आदर्श ठेऊनच देऊ शकतो. पुढच्या पिढीला कसे तयार व्हावे हे सांगणारे व्यक्तिमत्व डॉ. कराड आहेत. प्रत्येकाने आपले गाव मोठे करण्यासाठी कार्य करावे.”
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रस्तावनेत माईर्स एमआयटी द्वारे चालविल्या जााणर्या सर्व कार्यांची माहिती दिली. तसेच विश्वामध्ये मानवता किती महत्वाची आहे हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. आभार डॉ. सुचित्र कराड नागरे यांनी आभार मानले.
विश्वशांतीसाठी ज्ञान ज्योतीचे प्रज्वलन
विश्वबंधुत्व, सर्वधर्मसमभाव, समंजस्य आणि एकोप्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेलं गावं विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे मंगळवारी ‘विश्वशांतीची ज्ञान ज्योती’ चे प्रज्वलन करण्यात आले. नंतर ही ज्योत डॉ. विश्वजित नागरगोजे आणि सहकारी यांचेकडे हस्तांतरण करण्यात आले.
ही ज्योत ज्ञानभूमी आळंदीपासून, सांप्रदायिक सद्भावनाभूमी अजमेर, शक्तिभूमी अमृतसर आणि तिथून भारताची आध्यत्मिक राजधानी अयोध्या इथे प्रभु श्रीरामचंद्रांना वंदन करून बोधगया, वैशाली, जेरूसलेम, व्हॅटिकन सिटी मार्गे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात समर्पित करण्यात येणार आहे.
विश्वधर्मी मानवतातीर्थ म्हणून जगात रामेश्वर (रुई) ची ओळख पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे विचारः विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) नामकरण कोनशिलेचे अनावरण ‘विश्वशांतीची ज्ञान ज्योती’चे प्रज्वलन
RELATED ARTICLES


