ऑकलंड, न्यूझीलंड — ऑकलंड मराठी असोसिएशन (AMAI) यंदा आपल्या स्थापनेच्या ३० वर्षांचे यशस्वी पर्व पार करत आहे. या महत्त्वपूर्ण वर्षाचे औचित्य साधत, असोसिएशनने नुकताच एक दिवसीय मराठी नाट्यमहोत्सव २०२५ ऑकलंडच्या ग्रीन बे ऑडिटोरियममध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला.
ऑकलंड मराठी असोसिएशन (AMAI) चे अध्यक्ष श्री. चिनार चितळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, समिती सदस्य व स्वयंसेवकांच्या समर्पित मेहनतीमुळे हा नाट्यसोहळा संस्मरणीय ठरला. यामध्ये ऑकलंडमधील मराठी कलाकार मंडळींनी दिग्दर्शित व रंगमंचावर सादर केलेली चार दर्जेदार नाटके होती:
सावल्या
टॅक्स फ्री
खेळ सावल्यांचा
संज्या छाया
प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर यामुळे नाट्यमहोत्सवाची रंगत वाढली. हास्य, विचारप्रवृत्त करणाऱ्या कथा, आणि जीवनावरील भाष्य या नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
या प्रसंगी अध्यक्ष श्री. चिनार चितळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले:
“ही नाटके केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाहीत, तर ती आपली संस्कृती, आपले मूल्य, आपले विचार, आणि एकात्मतेचे प्रतीक आहेत. ही आपली ओळख जपणारी कला आहे.”
यावेळी त्यांनी असोसिएशनचे पहिले संस्थापक सदस्य श्री. उदय गोगटे (वय ८० वर्षे), श्री. हेमंत जोशी यांचे मनापासून स्वागत केले आणि . श्री दिनेश प्रधान, आणि श्री. धारप आणि दिवंगत संस्थापक सदस्य डॉ. सुधाकर मयदेव, यांचे मनापासून आभार व्यक्त केले , जर त्यांनी ३० वर्षांपूर्वी हे पाऊल उचलले नसते तर कदाचित आज आपण हा दिवस इतक्या उत्साहात साजरा करू शकलो नसतो. आपल्या मनोगतात श्री चितळे ह्यांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
ऑकलंड मराठी असोसिएशन (AMAI) दरवर्षी गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी यांसारखे पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरे करते. तसेच क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनही करते. यंदा गुढीपाडव्याचा सण क्रिकेट मैदानावर साजरा करत गुढी ला क्रिकेटच्या सामन्याचा साक्षीदार होण्याचा मान दिला !
ब्लड डोनेशन कॅम्प, न्यूझीलंडचे पंतप्रधान श्री. ख्रिस्तोफर लक्झन यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या न्यूझीलंड भेटीचे स्वागत, तसेच नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनाचे मोठ्या उत्साहात आयोजन हे या वर्षाचे ठळक आकर्षण ठरले.
या सर्व आठवणी आणि उपक्रम एकत्रितपणे मांडणाऱ्या ‘झुंजुमुंजु’ या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी झाले. याचे उद्घाटन संस्थापक सदस्य श्री. उदय गोगटे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप करताना अध्यक्ष श्री. चितळे यांनी आभारप्रदर्शन करत सांगितले:
“या यशस्वी नाट्यमहोत्सवासाठी मी मनापासून आभार मानतो आमच्या टीमचे — चैतन्य नेरकर, देवदत्त परांजपे, हर्षद बांदेकर, भूपाली देशपांडे, नेहा रेवणकर, अनिरुद्ध सईन, अनिकेत खेडेकर, अनुराग जाधव, रोहन मैत्रानी आणि दीप्ती झांट्ये यांचे. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते.”
मी आमच्या प्रायोजकांचे – शनायान आर्ट आणि सी एफ आय इवेंट्स ह्यांचे आभार, तसेच श्री सुधाकर मायदेव यांच्या पत्नी श्रीमती अनुराधा मायदेव यांचेही संस्थेला देणगी दिल्याबद्दल आभार
ऑकलंड मराठी असोसिएशनबद्दल (AMAI):
१९९५ साली काही मराठी कुटुंबांनी एकत्र येत ऑकलंडमध्ये या असोसिएशनची स्थापना केली. आपल्या मायभूमीपासून दूर राहूनही आपली ओळख, आपली संस्कृती जपण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आज AMAI ही दुसऱ्या पिढीतील मराठी कीवींसाठीही एक सशक्त सांस्कृतिक व्यासपीठ ठरली आहे. सण-उत्सव, कला, संगीत, नाटक, खेळ यांतून महाराष्ट्राचे वारसत्व इथे जोपासले जात आहे.


