आजकाल मुलेमुली मैदानावर खेळताना दिसण्याऐवजी जास्त करून मोबाईलशी खेळताना दिसत आहेत. हे चित्र या मुलामुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नसून या मुलामुलींनी मैदानावर खेळले पाहिजे,जेणे करून त्यांच्या शारीरिक मानसिक विकास चांगला होईल असे प्रतिपादन माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केले. मुंबईतील शिवाजी पार्क येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिर संस्थेने आयोजित केलेल्या १० दिवसांच्या उन्हाळी मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचे ध्वजारोहण
श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की,
मुलामुलींनी अधिकाधिक मैदानावर खेळले पाहिजे,यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.आपली मुले मोबाईल च्या आहारी जाऊन त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ नये,यासाठी सर्व पालकांनी दक्ष असले पाहिजे.
यामुळे केवळ या मुलामुलींचाच फायदा होईल,असे नाही तर देशाची भावी पिढी सक्षम,सशक्त घडण्यास मोठीच मदत होईल.
श्री समर्थ व्यायाम मंदिर संस्था
आणि विशेषतः मल्लखांब गुरू पद्मश्री उदय देशपांडे हे मल्लखांब खेळाचा जगभर प्रचार व प्रसार करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी संस्थेच्या सचिव प्राचार्य डॉ नीता ताटके यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी बोलताना त्यांनी
सांगितले की,आजचे प्रमुख पाहुणे श्री देवेंद्र भुजबळ यांनी,त्यांच्या भाषणात सांगितलेले ,”परिस्थिती पेक्षा मनस्थिती महत्वाची” हे वाक्य प्रत्येकाने आपल्या हृदयावर कोरून ठेवले पाहिजे,इतके ते महत्वाचे आहे.
प्रारंभी मल्लखांब प्रशिक्षक सचिन मळेकर यांनी श्री देवेंद्र भुजबळ यांचे स्वागत केले.
अतिशय आटोपशीरपणे झालेल्या या कार्यक्रमास उन्हाळी शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


