पुणे,16 मे 2025 : अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक,हृदयविकाराचा झटका आणि मुत्रपिंडाचे नुकसान होण्याची शक्यता वाढतेच याशिवाय दृष्टीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी रक्तदाबाचे निदान झालेल्या व्यक्तींनी नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ.सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की, उच्च रक्तदाबामुळे रेटिनल व्हॅस्क्युलर ऑक्लुजनची (आरव्हीओ) जोखीम वाढू शकते, या स्थितीमध्ये नसांमधून नेत्रपटलाकडे जाणारा रक्तप्रवाह खंडित होतो. यावर उपचार न केल्यास दृष्टी धूसर होऊ शकतो किंवा दृष्टी जाण्याचा धोका असतो.
काही व्यक्ती डॉक्टरांचा सल्ला न घेता रक्तदाबाची औषधे घेणे बंद करतात,ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडू शकते. अधिकाधिक तरूणांना उच्च रक्तदाबाचे निदान होत आहे ही सध्याची वस्तुस्थिती असून एक मोठी चिंतेची बाब ठरत आहे.
डॉ.कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करावी,ज्यामध्ये डॉक्टरांकडून डोळ्याच्या पडद्यामधील कोणत्याही असामान्यता तपासता येऊ शकतील. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब तसेच मधुमेह आहे,त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा देखील धोका असतो.
डॉ.कुलकर्णी म्हणाल्या की, डोळे हे रक्तदाबातील बदलांना संवेदनशील असतात,म्हणूनच डोळ्यांची नियमित तपासणी करणे हे केवळ दृष्टीशी संबंधित गुंतागुंत टाळण्यास मदत करत नाहीत,तर अनेक वेळा अशा तपासण्यांमधून संभाव्य उच्च रक्तदाबाचे निदान होण्यास देखील मदत होते.


