पुणे,16 मे 2025 : योग्य उपचार,उपचारातील सातत्य आणि जीवनशैलीत बदल यामुळे उच्च रक्तदाबामुळे होणारी गुंतागुंत आपण कमी करू शकतो,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त लवकर निदान आणि प्रभावी उपचार याबाबत जागृती केली जाते.यावेळेसची संकल्पना आहे – मेजर युवर ब्लड ॲक्युरेटली,कंट्रोल ईट ॲन्ड लिव्ह लाँगर (तुमचा रक्तदाब अचूक मोजा,नियंत्रित करा आणि दीर्घायुषी व्हा).
विश्वराज हॉस्पिटल येथील औषधशास्त्र विभागाचे संचालक डॉ.डी.एन.हंबीरे म्हणाले की,अनियंत्रित रक्तदाबामुळे स्ट्रोक,हृदयविकाराचा झटका,डोळ्यांमधील समस्या अशा अनेक गुंतागुंत होऊ शकतात.मात्र लवकर निदान,जीवनशैलीत बदल अणि उपचारातील सातत्याने ही गुंतागुंत टळू शकते.यातील एक मोठे आव्हान म्हणजे उपचारातील सातत्य हे दिसून येते.रक्तदाब एकदा नियंत्रणात आला की,काही रूग्ण स्वत:च औषधे बंद करून टाकतात आणि गुंतागुंतींची जोखीम वाढते.औषधे सुरू करण्याचा, कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय हा वय,वैयक्तिक आरोग्य,सहव्याधी इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असतो आणि तो निर्णय तज्ञांवर सोडावा.
जीवनशैली – जोखीम वाढविणारा महत्त्वाचा घटक
अतिरिक्त ताण,खाण्यात अतिरिक्त मीठाचे प्रमाण,जंक फूड,चुकीचा आहार,अतिरिक्त मद्यसेवन,तंबाखू, व्यायामाचा अभाव हे अनेक आजारांच्या बाबतीत जोखमीचे घटक आहेत आणि उच्च रक्तदाबामध्ये देखील तेच आहेत.एकेकाळी मध्यम वयानंतर दिसणारा हा आजार आता तिशीमधल्या तरूणांमध्ये देखील वाढत चालला आहे.मधुमेह आणि स्थुलता यामुळे यात आणखी भर पडली आहे.
डॉ.हंबीरे म्हणाले की,ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांनी आहार,व्यायाम आणि एकंदर जीवनशैली सुधारण्याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
यावर्षीच्या संकल्पनेबाबत बोलताना डॉ.हंबीरे म्हणाले की, डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाबाची पातळी तपासणे हा योग्य मार्ग आहे.अनेकांकडे घरात आता डिजिटल उपकरणे असतात,मात्र त्याचा कसा वापर करावा याचे मार्गदर्शन आपल्या डॉक्टरांकडून घ्यावे.रक्तदाबाची पातळी तपासताना त्याआधी आरामदायी स्थितीत पाठीवर झोपून किंवा 45 अंशात आरामात बसून मोजणे आवश्यक आहे.इतर मार्गदर्शक सूचना आपल्या डॉक्टरांकडून जाणून घ्याव्यात.
—


