पुणे, १९ मे २०२५: सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. च्या कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी योजना (सीएसआर) गटाने, सायबेज फाउंडेशनतर्फे पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना भेट देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक नवीन आणि सुसज्ज प्रतीक्षालयाचे लोकार्पण केले. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवले जावे तसेच विशेषतः जे तुरुंगवासाला सामोरे जात आहेत त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम सुविधा प्रदान करणे हा सायबेज फाउंडेशनचा महत्त्वाचा हेतू आहे.
हे प्रतीक्षालय समाजापासून दूर कोठडीत असलेल्या व्यक्तींप्रती असलेल्या दृष्टिकोनाला बदलण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी योग्य सुविधा पोहचवण्यासाठी राबवण्यात येत आहे. लहान मूल असलेल्या मातांपासून ते लांब प्रवास करून येणाऱ्या वृद्ध पालकांपर्यंत, सर्व कुटुंबियांना सुरक्षित आणि स्वच्छ, सन्मानजनक सुविधा प्रदान करण्यात येईल. ज्यामुळे त्यांना भावनिक आणि शारीरिक संघर्षाला तोंड देणे सुकर होईल.
“प्रतीक्षालय केवळ विटा आणि सिमेंटचा ढाचा नाही, तर ती सदभावना आणि सहवेदना यातून उभारलेली जागा आहे. अनेकदा खेड्यापाड्यांतून आलेली कुटुंबे आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी लांबचा, थकणारा प्रवास करतात. वर्षानुवर्षे ही कुटुंबे उन्हात, पावसात आणि समाजाच्या तिरस्कारपूर्ण नजरेत उभं राहून आपल्या व्यक्तीची वाट बघतात. या उपक्रमातून आम्ही या कुटुंबियांना एवढंच सांगू इच्छितो की, आम्हाला तुमची काळजी आहे आणि तुम्हालाही सन्मान मिळायला हवा.’ सायबेज फाउंडेशनमध्ये आमचे प्रयत्न नेहमी वास्तवतेला धरून, आणि परिणाम साधणारे असतात. हा प्रकल्प या तत्त्वज्ञानाचं एक प्रतिबिंब आहे. जिथे सहसा कोणी लक्ष देत नाही, अशा रिकाम्या जागा भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.” असे सायबेज फाउंडेशनच्या प्रमुख व सायबेज सॉफ्टवेअरच्या संचालक मंडळाच्या सदस्य, रितू नथानी यांनी सांगितले.
या नव्या प्रतीक्षा कक्षामध्ये १००० हून अधिक लोकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, अल्पोपहाराची सुविधा, मातांसाठी स्तनपान कक्ष, मुलाखत कक्षापर्यंत सुरक्षित मार्ग, कायदेशीर सल्ला कक्ष, तसेच अद्ययावत नोंदणी विभाग यांचा समावेश आहे. सायबेज फाउंडेशनने हा प्रकल्प पूर्णपणे स्वतःच्या सीएसआर कार्यक्रमाअंतर्गत विकसित केला असून, यामध्ये कारागृह प्रशासन आणि स्थानिक सरकारी यंत्रणांसोबत जवळून समन्वय साधण्यात आला आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री. सुनील ढमाळ यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना म्हटले, “इथे येणाऱ्या कुटुंबांमध्ये अशी अनेक माणसं असतात, जी भावनिक वेदना बाळगून असतात, जी कोणालाही दिसत नाही. ही सुविधा, भेटायला येणाऱ्या कुटुंबांच्या अनुभवामध्ये मोठा फरक घडवून आणेल. आम्ही सायबेज फाउंडेशनचे या अर्थपूर्ण सहवेदनेबद्दल मन:पूर्वक आभार मानतो.”
इतिहास आणि परंपरांनी समृद्ध असलेले येरवडा कारागृह आता एका अशा प्रकल्पाचे साक्षीदार झाले आहे, जे मानवी दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचं भविष्य दर्शवतं. ही जागा म्हणजे भावना आणि कृती यांचा सुंदर संगम आहे. दरवर्षी अंदाजे ३.५ लाखांहून अधिक नागरिक या प्रतीक्षालयाचा लाभ घेतील.


