*
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील मुलांसाठी यंदाची उन्हाळ्याची सुटी एक आगळी वेगळी पर्वणी घेऊन आली आहे. ती म्हणजे ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’. ही केवळ पुस्तकांची जत्रा नव्हे, तर कल्पनांचे इंद्रधनुष्य खुलवणारा, बालसाहित्याला नवे रंग देणारा, आणि छोट्यांच्या मनात मोठी स्वप्ने पेरणारा सोहळा असणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २५ मे २०२५ या कालावधीत गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट येथे ही जत्रा भरणार असून, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुली असेल.
बालवाचकांसाठी खास कार्यक्रम, लेखकांशी संवाद, जादूचे प्रयोग, पपेट शो, गोष्टींचे सादरीकरण, विज्ञानविषयक प्रात्यक्षिके आणि अनेक मनोरंजक उपक्रम यामध्ये असणार आहेत. याशिवाय ‘लेखकांशी गप्पा’, ‘बाल साहित्य लेखन स्पर्धा’ आणि ‘सर्वांसाठी परिपूर्ण ग्रंथनगरी’ यांसारखे उपक्रम देखील या जत्रेचा भाग आहेत.
या चार दिवसीय जत्रेत बालकांना साहित्य, विज्ञान, करमणूक व सांस्कृतिक अनुभव मिळणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, संवाद पुणेचे सुनील महाजन यांच्या पुढाकारातून हा बाल मेळा रंगणार असून, जत्रेतील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य आहेत.
*पुणे बाल पुस्तक जत्रेतील प्रमुख कार्यक्रम*
*२२ मे (गुरुवार)*
सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होईल आणि ५.३० वाजता जादूचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
*२३ मे (शुक्रवार)*
सकाळी ११ वाजता ‘हा खेळ सावल्यांचा’ (पपेट शो) – चैताली माजगावकर भंडारी व शिक्षण विवेकचे ताई-दादा यांची प्रस्तुती.
दुपारी २ वाजता ‘अभिजात मराठी भाषिक खेळ’ व बालकांनी लिहिलेल्या गोष्टींचे सादरीकरण (पुणे मराठी ग्रंथालय – बालविभाग).
दुपारी ३.३० वा. ‘गोष्टींची डायरी’.
सायं. ४.३० वा. ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिक’ – सादरकर्ते : आठ वर्षांचे अथांग सागर मुजुमले पाटील.
सायं. ५.३० वा. ‘लेखक तुमच्या भेटीला!’ – सहभाग : डॉ. संगीता बर्वे, ल. म. कडू, आबा महाजन, एकनाथ आव्हाड.
*२४ मे (शनिवार)*
स. ११ ते १ – ‘सलाम भारतीय वायुसेनेला’ – विमान, विज्ञान आणि प्रात्यक्षिके : सादरकर्ते : सदानंद काळे).
दुपारी २ ते ५ – ‘कथालेखन कसे करावे’ – अ. भा. मराठी प्रकाशक संघ व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजीव तांबे यांचे सत्र.
दु. ५ ते ६ – ‘चिंटू तुमच्या भेटीला’ – चारुहास पंडित यांची प्रस्तुती.
*२५ मे (रविवार)*
स. ११ वा. – ‘स्क्रीन टाईमचा राक्षस’ या विषयावर परिसंवाद – सहभाग : डॉ. श्रुती पानसे, स्मिता पाटील, अर्चना कुडतरकर.
सायं. ४.०० वा. – ‘नकला नगरी’ – सादरकर्ते : प्रकाश पारखी.
सायं. ५.०० वा. – ‘फुलपाखरू’ पुस्तकाचे प्रकाशन – लेखक श्रीपाद ब्रह्मे, प्रकाशन : स्वाती राजे, बुकगंगा पब्लिकेशन्स.
सायं. ६.०० वा. – ‘ड्रमसर्कल’ या कार्यक्रमाने समारोप.
*या बालजत्रेतील विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा.*


