पुणे,23 मे 2025 : लेझर आय शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये एक मोठे पाऊल पुढे टाकत पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात वेगवान आणि प्रगत ब्लेडलेस लेझर प्रणाली (व्हिझ्युमॅक्स 800 फेम्टोसेकंड लेझर सिस्टिम बाय झाईस) कार्यान्वित करण्यात आली आहे.अशा प्रकारची महाराष्ट्रातील ही पहिलीच यंत्रणा आहे.ही माहिती एचव्ही देसाई आय हॉस्पिटलमधील वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मुकेश परियाणी,डॉ.वर्षा पुराणिक आणि डॉ.संकेत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया आणि मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मुकेश परियाणी म्हणाले की, चष्म्यापासून मुक्तता मिळविणे हे अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांसाठी गरजेचे झाले आहे. ही फक्त सौंदर्याशी निगडीत बाब राहिलेली नाही. क्रीडा सारख्या अनेक क्षेत्रात ही गरज बनली आहे,जिथे चष्म्यापासून मुक्तीमुळे कामगिरी,सुरक्षितता आणि आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम पडू शकतो. आपला चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेसपासून मुक्तता मिळविण्यासाठी एक पर्याय म्हणजे लेझर प्रक्रिया,ज्याला रिफ्रॅक्टीव्ह सर्जरी असे म्हणतात.या प्रकारात एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे स्माईल (स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन). याचा वापर डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचा (कॉर्निआ) आकार बदलण्यासाठी केला जातो,जेणे करून प्रकाशकिरण हे कॉर्निआवर केंद्रित होतात आणि अपवर्तक त्रुटी (रिफ्रॅक्टीव्ह एरर) काढून टाकले जाते.हे नवीन तंत्रज्ञान अति जलद अशा फेम्टोसेकंड लेझर पल्सेस (लेझरमुळे तयार होणाऱ्या प्रकाशाच्या छोट्या छोट्या छटा) यांचा समावेश असून यामुळे कॉर्निआच्या पेशींमध्ये चकतीच्या आकाराचा तुकडा काढला जातो.हे जलद आणि सुरक्षित असून रिफ्रॅक्टीव्ह शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वाचा टप्पा आहे.
डॉ.वर्षा पुराणिक म्हणाल्या की,हे ऑटोमेटेड व रोबोटिक उपकरण अचूकता साधते व प्रक्रियेला कमी वेळ लागतो,सुरक्षितता प्रदान करते,ही प्रक्रिया रूग्णांसाठी सुकर होते आणि जलद पुर्नप्राप्ती शक्य होते.हे अद्ययावत फेम्टोसेकंड लेझर सिस्टिम माहितीसाठ्याच्या आधारे चांगली अंर्तदृष्टी देत शल्य चिकित्सकांना उपचारांमध्ये अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत करते.हे उपकरण जरी स्वयंचलित असले तरी उपचारांचे नियोजन,लेझरचा वापर आणि पेशींमधून चकतीच्या आकाराचा तुकडा (लेंटीक्युल) काढण्यात आणि अचूकता आणि रूग्ण सुरक्षितता साध्य करण्यामध्ये शल्यचिकित्सकांचा सर्वांत महत्त्वाचा वाटा असतो.
डॉ.संकेत कुलकर्णी म्हणाले की,या प्रक्रियेसाठी रूग्णाची पात्रता बघितली जाते आणि यासाठी डोळ्याची सखोल तपासणी केली जाते.यामध्ये कॉर्नियल टोमोग्राफी,रिफ्रॅक्शन,व्हिज्युअल ॲक्युईटी अशा तपासण्या केल्या जातात. प्रक्रियेनंतर नेत्रतज्ञांनी सांगितलेली काळजी व्यवस्थित घेत रूग्ण आपले दैनंदिन कामकाज तीन दिवसात सुरू करू शकतात. पहिल्या दोन दिवसातच दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते आणि पूर्णपणे पुर्नप्राप्तीसाठी साधारण एक महिन्याचा कालावधी आवश्यक असतो.
एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया म्हणाले की,जागतिक दर्जाच्या नेत्र सेवा प्रदान करण्यामध्ये आम्ही नेहमीच अग्रणी राहिलो आहोत.हे नवीन उपकरण म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक उपचार प्रदान करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करत कमीत कमी छेद वापरणाऱ्या व जलद पुर्नप्राप्ती शक्य करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती आमची कटिबद्धता यातून प्रतिबिंबित होते.
एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे म्हणाले की, एचव्ही देसाई आय हॉस्पिटल ही एक सर्वकांश नेत्रचिकित्सा संस्था आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॉर्निआ, काचबिंदू, रेटिना, आरओपी, बाल नेत्र चिकित्सा, ऑक्युलोप्लास्टी,रिफ्रॅक्टीव्ह एरर करेक्शन (लॅसिक) यांसारख्या अनेक विषयांसंबंधी उच्च दर्जाची नेत्रसेवा येथे प्रदान केली जाते.ही संस्था नेत्र चिकित्सामधील एक आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते.महाराष्ट्रात 40 नेत्रसेवा केंद्रांसह 10 जिल्ह्यांमध्ये संस्थेतर्फे नेत्रचिकित्सा सेवा प्रदान केल्या जातात.