नव्या पिढीतही रुजतेय पुस्तक वाचनाची आवड* *पुणे बाल पुस्तक जत्रेतील पुस्तकांच्या दालनांना बालवाचकांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद*

तारां कित Avatar

*

पुणे : ज्ञान-साहित्य-मनोरंजनाचे विश्व खुले करणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेतून नव्या पिढीत वाचनाची आवड रुजत आहे. इतिहासापासून विज्ञानापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके हातात घेऊन चाळणारी मुले-मुली, त्यांना पुस्तक खरेदीसाठी प्रोत्साहन देणारे आईवडील, लेखक-पुस्तकांविषयी माहिती देणारे प्रकाशक व बालसाहित्यकार, परिचित मुलांना भेट देण्यासाठी बाल साहित्याची भरभरून खरेदी करणारे वाचक, असा बाल साहित्याचा मेळा जत्रेत अनुभवता येत आहे. एरवी मोबाईल-लॅपटॉप-व्हिडीओ गेम्समध्ये हरवून जाणारी मुले पुस्तके पाहताना हरखून जात असल्याचे आशादायी चित्र जत्रेत पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या सत्तरहून अधिक नामांकित प्रकाशनांची दालने आहेत. या दालनांमध्ये कथा, कविता, कादंबरी अशा विविध प्रकारातील बालकुमार साहित्य उपलब्ध आहे. प्रख्यात बाल साहित्यकार ते नवोदित लेखकांनी लिहिलेल्या ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी, विज्ञान आदी विषयांवरील कथा, कविता, माहितीपर पुस्तके, भाषा शिक्षण, शास्त्रज्ञ, समाजसुधारक महनीय व्यक्ती यांची चरित्रे अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, डायमंड प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन, मनोविकास प्रकाशन, रोहन प्रकाशन, राजहंस प्रकाशन, लेट्स रीड बुक स्टोअर, सकाळ प्रकाशन, गमभन प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस, समकालीन प्रकाशन, वरदा प्रकाशन, शिक्षण विवेक, भाषा फाउंडेशन, बालभारती, किशोर मासिक अशा नामवंत प्रकाशन संस्थांची हजारो पुस्तके पालक, मुले आवर्जून खरेदी करीत आहेत. नवी पिढीतही पुस्तकांची ओढ प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.

*बालभारतीचे किशोर मासिक*

शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीच्या किशोर मासिकाने अनेक पिढ्यांतील बाल वाचकांना समृद्ध केले आहे. या मासिकाचे निवडक खंड या जत्रेत वाचायला मिळतील. किशोर मासिकाच्या मुखपृष्ठाचे प्रदर्शनही मुले, पालकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय विविध प्रकाशकांचे शैक्षणिक व वैज्ञानिक साहित्य, हसत खेळत गणित-विज्ञान-भूगोल-इतिहासाचे धडे देणारे खेळही बाल वाचकांच्या पसंतीस पडत आहेत.

*नाविन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल*

ही जत्रा २५ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे. बालसाहित्य, गोष्टी, विज्ञानप्रयोग, जादूचे प्रयोग, पपेट शो, लेखकांशी गप्पा, कथालेखन कार्यशाळा, जुने पारंपरिक खेळ अशा असंख्य नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल येथे अनुभवायला मिळणार आहे.

Tagged in :

तारां कित Avatar