*
*
पुणे : मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यात शिक्षण आणि संस्कृती अशा दोन गोष्टींचा मोठा वाटा असतो. पुणे बाल पुस्तक जत्रेतून मुलांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास होत असून, विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्याल मदत करणार उपक्रम आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग पुणे बाल पुस्तक जत्रेच्या आयोजनात अधिकृतपणे सहभाग घेईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांनी शनिवारी केली..
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेत आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात श्री. शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, श्री. धीरज घाटे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, श्री चारुहास पंडित, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. श्री शेलार यांच्या हस्ते
ल. म. कडू लिखित जॉर्ज कार्व्हर, डॉ. श्रुती श्री वडगबाळकर लिखित गोष्ट छबीची, कविता मेहेंदळे लिखित अनोखे मित्र आणि स्वाती उपाध्ये लिखित साने गुरुजी अशा पुस्तकांचे प्रकाशन झाले.
श्री. शेलार म्हणाले की, पुणे बाल पुस्तक जत्रा ही संस्कृती आणि इतिहासाला चालना देणारी जागा आहे. या दोन्ही गोष्टींना एकत्रित चालना मिळताना आपण पाहत आहोत. समाजात आव्हाने आणि अडचणी खूप वाढत आहेत. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूची एकूण सामाजिक परिस्थिती पाहिल्यास संस्काराची अत्यंत आवश्यकता असल्याचे जाणवते पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आत्ताची कुटुंब व्यवस्था यातील फरक स्पष्टपणे जाणवतो. पूर्वी घरी सर्व एकत्रितपणे जेवायला बसायचे, मात्र आता बहीण भावाला राखी बांधायला येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुलांमध्ये लहानपणीच संस्कार होण्याची गरज आहे. हे संस्कार रुजण्याची प्रक्रिया शिक्षण, संस्कृती आणि भारतीय खेळांमधून सुरू होते. बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी बालसाहित्य, संगीत, कला आणि भारतीय खेळांची आवश्यकता आहे. यामुळे मुलांच्या संवेदना जागरूक होतात. त्यांच्यातील गुणांचा विकास होतो. त्यामुळे पुणे बाल पुस्तक जत्रेसारख्या उपक्रमांना सांस्कृतिक विभागाचे नेहमीच पाठबळ असेल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
श्री. पृथ्वीराज म्हणाले की, पुणे महापालिका ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने पुणे महापालिका विविध उपक्रम साजरे करीत आहे.त्यातच एक उपक्रम पुणे बाल पुस्तक जत्रा आहे. पुणे महापालिका आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास मिळून पुण्यात एनबीटीचे प्रादेशिक केंद्र सुरू होत आहे. त्याचा पुणेकरांना फायदा होणार आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे महापालिका पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे बाल पुस्तक जत्रेसारख्या उपक्रमांना सहकार्य करीत राहील. श्री. राजेश पांडे यांनी पुणे बालक पुस्तक यात्रेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट करीत, पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणेच पुणे बालक पुस्तक जत्रेलाही आपलेसे केल्याचे सांगितले. प्रारंभी मंत्री श्री. शेलार यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट दिली. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा आनंद घेतला. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद मिरासदार यांनी आभार मानले.


