Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे बाल पुस्तक जत्रेचा रविवारी समारोप; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राहणार...

पुणे बाल पुस्तक जत्रेचा रविवारी समारोप; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राहणार उपस्थित*

*

पुणे : मुलांना वाचनाची गोडी लावून ज्ञान-मनोरंजनाच्या विश्वाची सफर घडवणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेचा रविवारी (२५ मे) दुपारी साडेतीन वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे समारोप होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेत पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात राहणाऱ्या हजारो मुलांनी आपल्या पालकांसमवेत बाल साहित्याचा अभिनव मेळा अनुभवला. आवडत्या पुस्तकांच्या खरेदीसह गोष्टी, विज्ञानाचे खेळ, जादूचे प्रयोग, पपेट शो, लेखकांशी गप्पा, कथा लेखन कार्यशाळा, जुने पारंपरिक खेळ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर खाऊ गल्लीत चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेतला. बालगोपाळांना साहित्य-संस्कृतीचे महत्त्व हसत खेळत सांगणाऱ्या या पुणे बाल पुस्तक जत्रेचा समारोप होत आहे.

जत्रेच्या समारोप सोहळ्यात बालभारतीच्या लोकप्रिय ‘किशोर’ मासिकाच्या आगामी अंकाचे प्रकाशन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

….

*’जाणता राजा’ महानाट्य विनामूल्य पाहण्याची संधी*

पुणे बाल पुस्तक जत्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे सायंकाळी ६.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे सादर केल्या जाणाऱ्या या महानाट्याला प्रवेश विनामूल्य आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचीय सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाणार असून, शिवचरित्र समजून घेण्यासाठी अधिकाधिक मुलांनी हे जगप्रसिद्ध महानाट्य पाहायला यावे, असे आवाहन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments