पुणे: व्यवसाय हा मोठाच हवा असा हट्ट धरु नका. व्यवसाय छोटा असला तरी चालेल, परंतु तो असा करा की ज्यामध्ये तुम्हाला पर्याय असू नये. सातत्य, मेहनत आणि अभ्यासाने हे शक्य होईल. व्यवसाय करण्यासाठी स्वत:मधील मानसिक क्षमता विकसित करायला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ.पराग काळकर यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजभूषण बाबुराव उर्फ आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पराग काळकर आणि बागेश्री मंथाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, प्रभारी प्राचार्या दिपाली पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अशोक मोजाड यावेळी उपस्थित होते.
डॉ.पराग काळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच व्यावसायिक प्रयोग करुन पहा. पुण्यासारख्या शहरात व्यवसायाच्या संधी शोधायला पाहिजे. बाहेरच्या शहरातून येऊन लोक पुण्यात व्यवसाय करतात, मग आपणही न लाजता आपल्याच लोकांसमोर व्यवसाय करायला पुढे यायला हवे. बागेश्री मंथाळकर, अण्णा थोरात यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रा.दिपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. डाॅ.अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले तर डाॅ.एल.जी. रेटवडे यांनी आभार मानले.


