पुणे : सत्कार करताना हातात मावत नाही इतका सत्कार ही मुले इतक्या लहान वयात घेत आहेत, यावरून त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील शक्यता लक्षात येते. आजच्या इंटरनेट व मोबाईलच्या युगात अशा संस्कार वर्गांची नितांत गरज आहे. अशा केंद्रांमधून पुढील पिढी सक्षम आणि सुसंस्कृत अशी घडवली जाते. त्यातही कसबा संस्कार केंद्राचे ४० वर्षांपासून हे कार्य सातत्याने सुरू असणे हे अधिक महत्त्वाचे आहे व कौतुकास्पद आहे, असे मत आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केले.
श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त कसबा कार्य गौरव पुरस्कार अक्षय शहापूरकर, क्षितिजा आगाशे, विनोद आढाव यांना प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, भाजप पुणे शहर उपाध्या स्वरदा बापट, संदीप लचके, गायक संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद गवळी, कसबा संस्कार केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, संयोजिका अनघा दिवाणजी, केंद्राचे सहाय्यक सहकारी सारिका पाटणकर, अपेक्षा राऊत, समृद्धी जाजू, संदीप लचके, प्रिती नायकवडी, पियुष शहा, किरण सरदेशपांडे, दिव्या राऊत, वसुधा वडके, अर्थव सरमहाले, रुपेश कुलकर्णी, दिशा पिगले उपस्थित होते. कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार क्रीडापटू व शास्त्रीय नृत्यांगना गायत्री शेजवलकर आणि बाल गौरव पुरस्कार साहसी क्रीडा खेळाडू शिवांश कर्डे व निष्ठा जाबरे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मिलिंद एकबोटे म्हणाले, अशा संस्कार केंद्रातून पुणे शहराचे पुण्य वाढविले जाते आहे. कारण अशा संंस्कार वर्गातून येणाऱ्या पुढील पिढीचा व्यक्तीमत्व विकास घडविला जातो. अशा प्रकारे संस्कार केंद्रांतून युवकांचा विकास झाला तर राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल यात काही शंका नाही. अशा पुरस्कारातून युवकांना प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
अनिल दिवाणजी म्हणाले, लहान मुलांवर चांगले संस्कार घडावेत आणि सुसंस्कारीत संपन्न भावी पिढी निर्माण व्हावी, यासाठी संस्थेच्या वतीने ‘बालसंस्कार केंद्र’ चालवले जाते. संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षीही पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दिवाणजी,अनघा दिवाणजी, समुध्दी जाजू, चैताली सरमहाले यांनी केले.


