Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआठवणीतील आप्पा -बाबा' मधून उलगडली गो.नी.दां. आणि बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गभ्रमंती इतिहास...

आठवणीतील आप्पा -बाबा’ मधून उलगडली गो.नी.दां. आणि बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गभ्रमंती इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने दुर्ग दिनानिमित्त आयोजन

पुणे : इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी आषाढ पावसात पुणे ते महाबळेश्वर केलेला सायकल प्रवास… शिवकालीन दुर्ग, प्राचीन दस्तऐवज, शिवकालीन परिवारांचे वंशज हा इतिहास जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर केलेली पायपीट…महाराष्ट्रातले अनेक दुर्ग, प्राचीन स्थळे, तीर्थक्षेत्री स्वतः पायी जाऊन पाहून इतिहास अनुभवणारे गो.नी. दांडेकर… या दोघांच्या आठवणी जागृत करीत त्यांनी केलेली दुर्गभ्रमंती उलगडण्यात आली. इतिहासाचे दीपस्तंभ ठरलेले बाबासाहेब आणि गोनीदां यांच्या आठवणींतून इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी यामाध्यमातून उपस्थितांना मिळाली.

दिनांक १ जून हा कै. गोनीदांचा स्मृतिदिन असून इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ‘ दुर्गदिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘आठवणीतील आप्पा -बाबा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गो.नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुर्गभ्रमंतीच्या आठवणींचा पट ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक डॉ.मिलिंद पराडकर आणि डॉ.सागर देशपांडे यांनी उलगडला. सदाशिव पेठेतील पेरुगेट भावे हायस्कूल च्या प्र.ल. गावडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.प्र.के.घाणेकर, रवींद्र अभ्यंकर, जगन्नाथ लडकत इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. तब्बल १३० पेक्षा अधिक गड किल्ले सर करणाऱ्या आणि गडकिल्ल्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी धडपडणाऱ्या सात वर्षाच्या शर्विका म्हात्रे हिचा सत्कार यावेळी करण्यात आला. वीणा देव व गोपाळराव चांदोरकर यांना कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली.

सुमारे ७०-८० वर्षा पूर्वी जेव्हा किल्ल्यांवर जाण्यासाठी मार्गदर्शक पुस्तके, नकाशे काही नव्हते तेव्हा डोंगर राने तुडवत, खडतर प्रवास करत गो.नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे या दोघांनी शिवचरित्रातील धारातीर्थे धुंडाळली. गतकालीन इतिहासाच्या वैभवशाली पाऊलखुणांचे विलोभनीय दर्शन घेतले. विशेष म्हणजे दोघांच्याही लेखणीवर सरस्वती प्रसन्न होती. आपल्या प्रासादिक लेखनातून हे महाराष्ट्राचे गौरवशाली दुर्गवैभव त्यांनी समाजापर्यंत पोचवले. त्यानंतरच्या कित्येक पिढ्या आप्पा आणि बाबांच्या पायवाटेवरून चालत गडकोटांना भेट देत राहिल्या.

डॉ. मिलिंद पराडकर म्हणाले, गो. नी. दांडेकर यांनी ज्या पद्धतीचे इतिहास लेखन केले आहे त्या पद्धतीचे लिखाण कोणी केलेले नाही. आज ट्रेकिंगच्या नावाखाली जे प्रकार सुरू आहेत ते दुर्दैवी आहेत. भावनिक दृष्टीने तरुणाई गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सागर देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रक्तात आहेत. समाजातील काही लोकांच्या रक्तात ते नाहीत असे रक्तदोषी वाढत चालले आहेत. गो. नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास आणि शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी, जिव्हाळा होता. गो.नी. दांडेकर हे शिस्तबद्ध होते आणि बाबासाहेब पुरंदरे हे वेळ आणि शब्द पाळणारे होते. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळणार नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे मत होते. या दोघांनी आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी त्यांची हयात खर्च करून इतिहास वर्तमान काळात आणून ठेवला.

मोहन शेटे म्हणाले, गो. नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे हे दोन व्यक्ती नाहीत तर विचार आणि मार्ग आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांकडे संवेदनशील दृष्टीने बघण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रणव सदरजोशी याने सूत्रसंचालन केले व ओंकार नेर्लेकर याने शिवस्तुती गायन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments