पुणे, दि. 24: शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर आवश्यक कृषी निविष्ठा चांगल्या गुणवत्तेची आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट हे शेतकऱ्यांचे संघटित स्वरूप आहे. परवाना मिळाल्यास ते एकत्रितपणे कृषी निविष्ठा खरेदी करून शेतकरी सदस्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देऊ शकतील. तसेच कृषी निविष्ठाच्या खरेदी विक्री आणि वापराबाबत जागृती निर्माण करता येईल. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना चांगल्या प्रतीची कृषी निविष्ठा मिळेल.
परवान्यासाठी आपल्या जिल्ह्यातील परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास भेट देऊन माहिती घेऊन अर्ज करावेत, असेही पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
दत्तात्रय गावसाने, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे: शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या नामांकित कंपन्यांकडून थेट कृषी निविष्ठा खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळेल. जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी परवान्यासाठी नोंदणी करावी.


