अतिशय हृदयद्रावक आणि दुर्दैवी अपघातात, एअर इंडियाचे विमान एआय१७१ च्या १२ विमान कर्मचाऱ्यांना देखील प्राण गमवावे लागले. कायमच्या दुरावलेल्या आपल्या या “कुटुंबाला” श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे सहकर्मचारी एकत्र आले होते. एअर इंडियाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात या सर्वांच्या आजवरच्या वेगवेगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि अवघे वातावरण स्तब्ध होऊन गेले. बातम्यांच्या मथळ्यांच्या पलीकडे जाऊन मानवी हृदयातील दुःखाचा कल्लोळ किती सखोल असू शकतो ते याठिकाणी सर्वांनीच अनुभवले.
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना भावनांचा आवेग आवरणे खूप कठीण जात होते, ते म्हणाले, “आज आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. हे नुकसान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कायम सलत राहील. आज या घडीला आपल्या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे, आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या आठवणींचा, त्यांनी दिलेल्या सेवेचा, त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा आणि त्यांच्या साहसाचा आदर राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि पुढील संपूर्ण वाटचालीत आपण ती पार पाडत राहू.”
यानंतर एकेका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मनाचा ठाव घेणाऱ्या होत्या, त्यांच्यापैकी अनेकांनी एआय१७१ च्या त्या कर्मचाऱ्यांसोबत कितीतरी वेळा काम केलेले होते.
तब्बल ३० वर्षे ज्यांनी आपले सेवकर्तव्य चोख बजावले असे कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या फ्लाईंग स्कूलमधील टोपणनावामागची कहाणी सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. “सॅड सॅक” ताणतणावाच्या प्रसंगी देखील एक शांत स्मितहास्य कॅप्टन सुमीत यांच्या चेहऱ्यावर दिसत असे त्यावरून त्यांच्या जवळच्या मित्रांनी केलेला हा विनोद होता. “त्यांनी कधी कोणाशी स्पर्धा केली नाही, त्यांनी प्रत्येकाचा आनंद साजरा केला. कॅप्टन सुमीत यांनी युनिफॉर्म फक्त परिधान केला नाही तर त्याचा सन्मान उंच केला.”
अवघ्या २६ वर्षांचे फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे त्यांच्या बॅचमित्रांसाठी फक्त एक सहकर्मचारी नव्हते. “तो आमचा खूप लाडका भाऊ होता.” हे सांगताना एका कर्मचाऱ्याला रडू आवरणे खूप कठीण जात होते. “पृथ्वीच्या आकाशातून त्याने स्वर्गाच्या आकाशात भरारी घेतली. त्याची आठवण कायम जिवंत राहील.”
केबिन कर्मचाऱ्यांच्या कहाण्या देखील हृदयद्रावक होत्या. केबिन सुपरवायझर श्रद्धा धवन यांच्या एका मैत्रिणीने त्यांच्या कर्तव्यनिष्ठेविषयी सांगितले, एअर इंडियामध्ये आल्यापासून या दोघींची खूप घट्ट मैत्री होती. “फ्लाईटवरून परतल्यानंतर श्रद्धा कितीही थकलेली असली तरी सर्वात आधी पुढील सेक्टरसाठी स्वतःचा युनिफॉर्म इस्त्री करून ठेवायची. कितीही कठीण आणि आव्हानात्मक काम असले तरी श्रद्धाने नेहमीच स्वतःचे कर्तव्य हसतमुखाने आणि साहसाने बजावले.”
सोबत काम करणाऱ्या मित्रमैत्रिणींनी मैथिली पाटील यांची आठवण सांगितली की, त्या प्रत्येक विमानात स्वतःसोबत भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि भगवद गीतेची प्रत नेत. नगंथोई शर्मा कोंगब्राइलातपम यांनी अतिशय उत्साहाने आपल्या बहिणीला मेसेज केला होता की त्या लंडनला जाणाऱ्या विमानात आहेत आणि १५ जूनला परत येतील. दीपक पाठक आणि अपर्णा महाडिक यांच्यासारखे अनुभवी कर्मचारी असोत किंवा इरफान शेख, लामनूंथेम सिंगसोन, सैनीता चक्रबोर्ती, रोशनी सोनघरे आणि मनीषा थापा यांच्यासारखे नुकतेच सेवेत रुजू झालेले असोत, त्यांची सेवा निष्ठा, प्रवाशांविषयीची आपुलकी आणि सहानुभूती याबद्दल सर्वच टीम सदस्य भरभरून बोलले.
सैनीता यांच्याविषयी बोलताना त्यांच्या एका मैत्रिणीचे शब्द होते, “विमान हे आमच्यासाठी फक्त एक मशीन नसते. ते आमचे दुसरे घर असते.” संपूर्ण एअर इंडिया परिवार, त्यांचे सर्व कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांच्यासाठी हे नुकसान अपरिमित आहे, आकाशाविषयीची आवड, समर्पण आणि करुणा यांच्या अनेक आठवणी कायम या सर्वांच्या मनात रा
हतील.


