पुणे,12 फेब्रुवारी 2024 : प्रख्यात हृदयप्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.मनोज दुराईराज यांची इंडियन असोसिएशन ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर – थोरॅसिक सर्जन्स (आयएसीटीएस) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ.दुराईराज हे या संघटनेचे 55 वे अध्यक्ष असून 2022 साली आयएसीटीएसच्या निवडणुकीत त्यांची निवड करण्यात आली.आयएसीटीएसच्या कार्यकारी समितीमध्ये डॉ.दुराईराज यांच्यासह वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.व्ही.देवागौरव,उपाध्यक्ष डॉ.सत्यजित बोस, सचिव डॉ.सी.एस.हिरेमठ,सहसचिव व खजिनदार डॉ.प्रभाता रश्मी,मुख्य संपादक डॉ.ओ.पी.यादवा,पूर्व अध्यक्ष डॉ.लोकेश्वराराव सज्जा,वरिष्ठ पूर्वअध्यक्ष डॉ.झेड.एस.मेहेरवाल व कार्यकारी सदस्य डॉ.आलोक माथूर,डॉ.बी.आर जगन्नाथ, डॉ.प्रसन्ना सिंह मोहनराव,डॉ.देबाशिष दास,डॉ.शिवा मुथ्थूकुमार,डॉ.गुंटुरू वरूण यांचा समावेश आहे.
डॉ.मनोज दुराईराज यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस,नवी दिल्ली येथून एमसीएच सुपर स्पेशालिटी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आजवर त्यांनी 20 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिक तसेच हृदय शस्त्रक्रियेवरील पुस्तकांमध्ये प्रबंधांद्वारे योगदान दिले आहे.डॉ.दुराईराज आणि त्यांच्या टीमने पुण्यात 2017 साली शहरातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती.तसेच महाराष्ट्रात तीन हृदय प्रत्यारोपण केंद्र प्रस्थापित करण्यात योगदान दिले आहे.
आयएसीटीएसच्या उपक्रमांबाबत बोलताना डॉ.दुराईराज म्हणाले की,भारतात जागतिक दर्जाचे हृदय शल्यचिकित्सक कार्यरत आहेत. माहितीसाठ्याचे योग्य संकलन,शोध निबंध या दिशेने काम करून या क्षेत्रात आणखी सुधारणा आणण्याचे दृष्टीने प्रयत्नशील राहू.
तरूण पिढीमधील शल्यचिकित्सकांचे ज्ञान आणि कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने मुंबई येथे स्कील लॅब विकसित केली जाईल.की होल कार्डियाक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक कार्डियाक शस्त्रक्रियेसह या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे हे स्किल लॅब नवीन पिढीला प्रशिक्षण देईल.
डॉ.दुराईराज म्हणाले की, लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले जातील.