पुणे,7 जुलै 2025 : नोबल हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने आयटी अभियंता असलेल्या एका 38 वर्षीय महिलेच्या मणक्यात निर्माण झालेला दुर्मिळ ट्युमर लॅमिनेक्टोमी ॲन्ड डीकॉम्प्रेशन ऑफ कॉर्ड या प्रक्रियेद्वारे काढण्यात यश मिळवले. या टीमचे नेतृत्व नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील स्पाईन सर्जन डॉ.विशाल चौधरी यांनी केले.या ट्युमरच्या ठिकाणामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती.सहा महिन्यापासून तीव्र वेदना होत असलेल्या या महिला रूग्णाला यातून सुटका मिळाली असून आता पुन्हा कामावर जाण्यास सज्ज झाली आहे.
याविषयी माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील स्पाईन सर्जन डॉ.विशाल चौधरी म्हणाले की,सहा महिन्यापूर्वी या महिला अभियंत्या आमच्या ओपीडीमध्ये आल्या होत्या.तेव्हा सातत्याने होत असलेल्या तीव्र पाठीच्या वेदनांनी त्या ग्रस्त होत्या. पाठीतील वेदना या कुठल्याही कामकाजानंतर नव्हे तर रात्री झोपेत किंवा कुठल्याही वेळी उद्भवत असायच्या. त्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी औषधे व फिजिओथेरपी द्वारे यासाठी उपचार घेण्याचा प्रयत्न केला,परंतु वेदना कमी झाल्या नाहीत. अशा प्रकारची लक्षणे लक्षात घेता मणक्याचा एमआरआय करण्याचे आम्ही ठरवले.त्यामध्ये पाठीच्या कण्याच्या मध्यभागी ट्युमर असल्याचे आढळून आले,याला टेराटोमा ऑफ कॉर्ड ॲट डी9 लेव्हल असे म्हणतात.
(पाठीच्या कण्यात निर्माण झालेल्या टेराटोमा ऑफ कॉर्ड ॲट डी9 लेव्हल हा जंतूपेशींपासून निर्माण होणारा एक दुर्मिळ ट्युमर आहे.हा ट्युमर सामान्यत: पाठीच्या कण्यातील किंवा आजूबाजूच्या उतींमध्ये आढळतो.या ट्युमरचे निदान सहसा एमआरआय किंवा हिस्टोलॉजिकल तपासण्या (पेशींची मायक्रोस्कोपिक तपासणी) याद्वारे केली जाते. उपचारांमध्ये बहुतांशवेळा ट्युमर काढून टाकण्यासाठी आणि पाठीचा कण्यावरील दाब काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते)
अशा प्रकारचे ट्युमर हे दुर्मिळ असतात.जर याचे निदान वेळेवर केले गेले नाही तर पायातील ताकद कमी होऊ शकते आणि मणक्याचे कायमचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे आम्ही लॅमिनेक्टोमी ॲन्ड डीकॉम्प्रेशन ऑफ कॉर्ड प्रक्रिया करायचे ठरवले असे डॉ.चौधरी म्हणाले.पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी या प्रक्रियेच्या महत्त्वाबाबत रूग्णाचे समुपदेशन करण्यात आले.
लॅमिनेक्टोमी प्रक्रियेमध्ये पाठीच्या कण्यावर किंवा नसांवर येणारा दाब कमी करण्यासाठी कशेरूकाच्या हाडाचा एक भाग (लॅमिना) काढून टाकण्यात येतो.मायक्रोस्कोप,एंडोस्कोप वापरून शल्यचिकित्सकाला अधिक चांगले दृश्य प्रदान होते आणि यामुळे कमीत कमी छेद वापरून अधिक अचूकतेने काम करता येते.या प्रक्रियेदरम्यान कुठल्याही नसांवर कोणत्याही प्रकारचा दाब पडतोय का किंवा काही परिणाम होत आहे का यासाठी सातत्याने न्युरो मॉनिटरींग सिस्टिमचा वापर करण्यात येतो.ट्युमरचे स्थान,प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित जोखीम यासाठी विशेष कौशल्य आवश्यक असते.या अभियंतेच्या बाबतीत या प्रक्रियेला सुमारे साडेचार तास लागले.
या प्रक्रियेदरम्यान 5X5X3 या आकाराचा ट्युमर काढून टाकण्यात आला.पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये हा ट्युमर कर्करोगग्रस्त नसल्याचा व एकाच ठिकाणी स्थित असल्याचे परंतु आक्रमक असल्याचे निदान झाले.अशा प्रकारची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि शस्त्रक्रियेनंतर पायातील ताकद जाणे किंवा मुत्राशयातील संवेदना कमी होणे अशी जोखीम असू शकते.
डॉ.विशाल चौधरी म्हणाले की,या शस्त्रक्रियेनंतर आता ही महिला पूर्णपणे बरी असून घरचे दैनंदिन काम आणि सोसायटीच्या आवारात चालणे या सर्व गोष्टी करत आहे आणि आता आपल्या कामावर जाण्यासाठी सज्ज आहे.
ते पुढे म्हणाले की,अशा स्थितींमुळे लवकर निदान आणि उपचार याचे महत्त्व अधोरेखित होते.आपण अनेकदा पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जेव्हा दुखणे कमी होत नाही आणि आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये याचा परिणाम होतो तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.अनेक लोक मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी तयार नसतात,परंतु उपचारपध्दती आता आधुनिक झाल्या असून शस्त्रक्रिया पश्चात असणारी जोखीम लक्षणीयरित्या कमी झाल्या आहेत.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,या यशस्वी प्रक्रियेमुळे निदान ते उपचारामध्ये असलेले आमच्या टीमचे कौशल्य आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधा यामुळे प्रक्रियांमधील अचूकता आणि रूग्णांसाठी चांगले परिणाम अधोरेखित होतात.या यशासाठी या सर्व टीमचे आम्ही अभिनंदन करतो.विशेष करून या अभियंत्याला आपल्या कामावर पुन्हा जाता येईल याचा आम्हाला वि
शेष आनंद आहे.


